अक्षय भालेराव खून प्रकरणात नऊ जण ताब्यात , शरद पवार म्हणाले की..

शेअर करा

महाराष्ट्रात एक संतापजनक अशी घटना नांदेड जिल्ह्यात समोर आलेली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या रागातून एका 24 वर्षीय अनुसूचित जातीच्या तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे . सदर घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून या प्रकरणाला आता राजकीय रंगदेखील देण्यात येत असून गावातील वातावरण स्फोटक आहे. सदर प्रकरणात आत्तापर्यंत सात जणांना अटक केली असून गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या या हल्ल्यामध्ये मयत तरुण याच्या भावासह आईदेखील जखमी झालेल्या आहेत .

उपलब्ध माहितीनुसार, अक्षय भालेराव असे मयत तरुणाचे नाव असून बोंढार हवेली येथील ही घटना आहे. अक्षय भालेराव गुरुवारी संध्याकाळी रस्त्यावरून जात होता त्यावेळी एका लग्नाच्या वरातीत आरोपी हातात तलवार घेऊन नाचत होते त्याचवेळी आरोपींनी अक्षय भालेराव आणि त्याच्या भावावर खुनी हल्ला केला. अक्षय भालेराव आणि त्याचा भाऊ आकाश यांना पाहिल्यानंतर एका आरोपीने यांची हिम्मतच कशी झाली असे म्हणत त्यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर आरोपींनी अक्षय भालेराव याला बेदम मारहाण करत त्याच्यावर चाकूचे वार केले. अक्षयच्या पोटात चाकूने वार केल्यानंतर दोन गटात दगडफेक देखील झाली मात्र दरम्यानच्या काळात अक्षय याचा मृत्यू झालेला होता. अक्षय एका राजकीय पक्षाशी देखील संबंधित होता.

अक्षय भालेराव याचा भाऊ आकाश भालेराव याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संतोष संजय तिडके , कृष्णा गोविंद तिडके ,निळकंठ रमेश तिडके, नारायण विश्वासराव तिडके, शिवाजी दिगंबर तिडके सोबतच एकूण नऊ जणांच्या विरोधात खून आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. न्यायालयाने त्यांना नऊ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याप्रकरणी , ‘ नांदेड येथील ही घटना अत्यंत निंदनीय आहे. पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना शोभणारी नाही. राज्य सरकारने घटनेच्या खोलात जाऊन जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. सरकारने या खून प्रकरणाची सखोल चौकशी करावी ‘ अशी मागणी केलेली आहे.


शेअर करा