
देशातील सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे कितीही प्रयत्न होत असले तरी देशातील नागरिक नेहमीच एकोप्याने राहण्यास प्राधान्य देताना दिसून येत आहेत. बीड जिल्ह्यात असाच एक कौतुकास्पद प्रकार समोर आलेला असून अंबाजोगाई तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहाच्या मांडवात चक्क मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारची पंगत देण्यात आलेली होती. हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्याचा संदेश पाटोदा येथील ग्रामस्थांनी दिलेला असून त्यांच्या या उपक्रमाचे सोशल मीडियात कौतुक केले जात आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा इथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहात सर्व धर्मीय नागरिक सहभागी होतात आणि हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात. सध्या रमजानचे उपवास सुरू असल्याकारणाने मुस्लिम बांधव देखील सप्ताह यशस्वी करण्यासाठी देखील कार्यरत होते या उद्देशाने हरिनाम सप्ताहमध्ये इफ्तारच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते.
गावचे सरपंच अविनाश उगले, आनंद स्वामी , हभप उगले महाराज, श्रीकृष्ण तोडकर, अशोक देशमुख, बाळासाहेब जामदार, बालाजी साखरे ,चंद्रकांत सर्वदे ,गोविंद घोरपडे, विलास पन्हाळे , विलास पाटील ,बलभीम जामदार यांच्यासोबत इतरही अनेक सर्वधर्मिय बांधवांनी यासाठी परिश्रम घेतले.