
कोरोना काळात देशातील आरोग्य सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याचे समोर आलेले होते. कोरोना संपला तरी देखील परिस्थितीत फारसा बदल झालेला नसून असाच एक संतापजनक असा समोर आलेला आहे. भोपाळजवळ एका सहा वर्षाच्या मुलाने आपल्या आजारी वडिलांना चक्क हातगाडीवर झोपवून उपचारासाठी सरकारी दवाखाना गाठलेला आहे. सिंगरौली जिल्ह्यातील बलियारी येथील हे प्रकरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलाच्या वडिलांना अचानकपणे त्रास होऊ लागला त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेसाठी देखील फोन केला मात्र रुग्णवाहिका आली नाही म्हणून अखेर या मुलाने त्याच्या वडिलांना हातगाडीवर घेऊन जाण्यासाठी कंबर कसली आणि हा अल्पवयीन चिमुरडा वडिलांना हातगाडीवर झोपवून हातगाडी लोटत रुग्णालयापर्यंत घेऊन गेला. सदर घटनेचा व्हिडिओ काही लोकांनी शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
सदर प्रकार समोर आल्यानंतर सिंगरौली जिल्हा प्रशासन खडबडून जागे झालेले असून रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याची कारणे शोधण्याचे आदेश मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांना देण्यात आलेले आहेत. रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही यामुळे या मुलाने हा प्रकार केला त्याबद्दल सोशल मीडियात मध्यप्रदेशातील आरोग्य सुव्यवस्थेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.