अचानक पाठीमागून आला अन चुंबन घेऊन पळाला , महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शेअर करा

पुण्यात डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचे चुंबन घेऊन पलायन केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अशाच स्वरूपाची दुसरी एक घटना मुंबई येथे उघडकीला आली आहे. मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडलेली असून सकाळी साडेनऊच्या सुमारास कामावर चाललेल्या एका 21 वर्षीय तरुणीला एका व्यक्तीने खुलेआम पकडून तिचे चुंबन घेतले आणि त्यानंतर तिथून पलायन केले. बोरीवली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर मुलगी ही एका मार्केटिंग कंपनीत काम करत असून आरोपी तरुण हा इलेक्ट्रिशियन असल्याचे समजते. अमु कुमार सिंग ( वय 26 ) असे आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. सदर तरुणी ही गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पुलावरून सकाळी साडेनऊच्या सुमारास चाललेली होती त्यावेळी आरोपी पाठीमागून आला आणि तिला घट्ट आवळून धरत तिचे चुंबन घेतले आणि तिथून पलायन केले.

अचानकपणे हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने आरडाओरडा सुरू केला त्यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. त्याची यथेच्छ धुलाई करून केल्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणी आणि आरोपी यांची ओळख देखील नाही. पीडित आरोपी हा मनोरुग्ण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे मात्र भरदिवसा घडलेल्या या प्रकारानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.


शेअर करा