
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड आणि राजकारणी असलेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोन्ही जणांची वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजला घेऊन जात असताना पत्रकाराच्या वेशात आलेल्या तीन जणांनी गोळीबार करून हत्या केलेली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यामध्ये अतिक अहमद याच्या डोक्यात गोळी मारलेली दिसून येत आहे. अत्यंत धक्कादायक आणि डिस्टर्ब करणारा हा व्हिडिओ आहे.
अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी असलेला आसद आणि त्याचा साथीदार गुलाम यांचा गुरुवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झालेला होता. उमेश पाल यांची हत्या झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार होते. उमेश पाल यांच्या हत्येचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झालेला असून त्यामध्ये असद आणि गुलाम हे गोळीबार करताना दिसून येत आहेत.
अतिक अहमद याने शुक्रवारी त्याच्या वकिलामार्फत मुलाच्या दफनविधीला उपस्थित राहण्यासाठी अर्ज दिला होता त्यावर निर्णय होण्याआधीच असद याचा अंत्यविधी पार पाडण्यात आला. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना मेडिकल चेकअपसाठी आणले जात असताना प्रसार माध्यमांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती त्यावेळी मीडियाला बाईट देत असतानाच एका व्यक्तीने अतिक अहमद याच्या डोक्यात रिवाल्वरमधून गोळी झाडली. दोन्ही भावांना एकत्रित बेडी आणल्या असल्याकारणाने अशरफ हा देखील पळून जाऊ शकला नाही अन त्याला देखील हल्लेखोरांनी ठार केले. उत्तर प्रदेशात पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने आत्तापर्यंत या प्रकरणात 17 जणांना निलंबित करण्यात आलेले आहे.
तीनही हल्लेखोर माध्यम प्रतिनिधी बनून तिथे आलेले होते. त्यांची नावे लवलेश , सनी आणि अरुण अशी असल्याची प्राथमिक माहिती असून घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. अतिक अहमद आमदार आणि खासदार राहिलेला असून बाहुबली म्हणून त्याची उत्तर प्रदेशात इमेज होती. सहा दिवसांपूर्वी पोलीस व्हॅन गाडीतून माध्यमांशी बोलताना त्याने ‘ उत्तरप्रदेशात दहशत कधीच संपली आता फक्त खेळ चालू आहे ‘ असे सांगितलेले होते त्यानंतर त्याची अशी हत्या केली गेल्यामुळे त्याच्याकडे असलेली अनेक रहस्य देखील आता गुप्तच राहणार आहेत.