
महाराष्ट्रातील शेतकरी पिकाला भाव नसल्याने मोठ्या अडचणीत सापडलेला असताना जिथे कुठे मालाला भाव चांगला मिळेल तिथे जाऊन आपला माल मिळेल त्या भावाने शेतकरी विकत आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक शेतकरी द्राक्ष माल विक्रीसाठी नवी मुंबई येथे आलेला असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्याच्या गाडीला जॅमर तर लावलाच शिवाय गाडीतील काही द्राक्षांची देखील लूट केल्याचे समोर आलेले आहे . सदर प्रकरणाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
गोविंद निवृत्ती डोंगरे असे या पीडित शेतकऱ्याचे नाव असून ते नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एका गावात राहतात. द्राक्षाला परिसरात योग्य भाव मिळत नसल्याकारणाने त्यांनी 50 क्रेट द्राक्ष टेम्पोमध्ये टाकून नवी मुंबई येथे ते टेम्पो घेऊन आलेले होते. घनसोली रस्त्यावर त्यांनी टेम्पो उभा केला याचवेळी एका ऑफिसरने त्यांना टेम्पो उभा करण्यापासून रोखले आणि काही माल दमदाटी करत लुटून नेला त्यानंतर कार्यालयात येऊन दंड भरण्याची देखील त्यांनी ताकीद दिली. मानसिक त्रास झाल्यानंतर डोंगरे यांनी हा प्रकार परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानी घातला. सदर अधिकाऱ्याचा व्हिडिओ दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नितीन सालसरे यांच्यापर्यंत देखील पोहोचला होता.
सांगा काय करायचं शेतकऱ्याने! स्वखर्चाने नेऊन, कुणालाही कुठलाही त्रास न देता द्राक्ष विक्रीसाठी #नाशिक हून #मुंबई गाठले, मात्र इथंही त्यांना अधिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागला. #Nashik #Mumbai #Grapes pic.twitter.com/7hdwWZybI6
— PAWAR GOKUL (@TheJournalistDD) March 10, 2023
नितीन सालसरे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तात्काळ या अधिकाऱ्याला समज दिली आणि शेतकऱ्याच्या गाडीतला लावलेले जॅमर अखेर काढण्यात आले . तक्रारदार शेतकरी असलेले डोंगरे यांनी व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांचा उल्लेख केल्यावर अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच गाळण उडाली. एकीकडे शेतीमालाला भाव नसताना अशा परिस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणचे टोल , सगळीकडच्या इंट्री पावत्या असे करत शेतकरी कसाबसा माल घेऊन मार्केटपर्यंत पोहोचतो मात्र तिथे आल्यानंतर देखील त्याला अक्षरशः लुटण्यात आल्याचा हा प्रकार समोर आलेला असल्याने सोशल मीडियात देखील या कर्मचाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे मात्र दरम्यानच्या काळात वेळ निघून गेल्याने अखेर ही द्राक्षे अखेर खराब झालेली आहेत.