
मार्च महिना शेवटच्या टप्प्यात असल्याने वसुली करणाऱ्या कंपन्यांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे जोरदार पाठपुरावा सुरू केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भलताच प्रकार समोर आलेला असून एका शेतकऱ्याने कर्जावर घेतलेल्या दुचाकीचे हप्ते थकले म्हणून कर्जवसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याची दुचाकी जप्त केलेली आहे मात्र दुचाकी ज्या पद्धतीने त्यांनी नेली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे.
वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथील ही घटना असून सदर कर्मचारी हे दुचाकी चक्क दुसऱ्या दुचाकीवर घेऊन जाताना दिसत आहेत. परिसरातील एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला अन तो जोरदार व्हायरल झालेला आहे.
वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथील एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी फायनान्सवर दुचाकी विकत घेतलेली होती त्यानंतर हप्त्याची परतफेड न झाल्याकारणाने 16 मार्च रोजी फायनान्सचे दोन कर्मचारी या शेतकऱ्याच्या घरी गेले आणि हप्ते भरा नाही तर दुचाकीची चावी द्या असे शेतकऱ्याला सांगितले. शेतकऱ्याने हप्ते भरण्यास असमर्थता दर्शवली तसेच गाडीची देखील चावी दिली नाही म्हणून या कर्मचाऱ्यांनी चक्क दुचाकी उचलली आणि आपल्यासोबत आणलेल्या दुसऱ्या दुचाकीवर घेऊन तिथून निघून गेले. सदर दुचाकी घेऊन जात असताना फायनान्स कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.