
शेती करण्यासाठी महत्त्वाची असलेली वीज हीच मुळात अनेक ठिकाणी वेळेला उपलब्ध होत नसून त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. रात्री अपरात्री वीज येत असल्याने अक्षरशः जीवाचा धोका पत्करून शेतकरी बांधव शेती करतात . ग्रामीण भागात विजेचा पुरवठा नसल्याने शेवटी आकडा टाकण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही अशा शब्दात एका शेतकरी बांधवाने इंग्रजी भाषेत महावितरणच्या अधिकाऱ्याला खडे बोल सुनावलेले होते. महावितरणला इंग्रजी भाषेत झापलेले चांगलेच लक्षात आलेले असून त्यानंतर तात्काळ या शेतकऱ्याला विजेची जोडणी देण्यात आलेली आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील वयस्कर शेतकरी असलेले वेताळ चव्हाण यांच्याकडे हा अधिकारी वीज चोरी अर्थात आकडा पकडण्यासाठी केलेला होता. त्यावेळी त्यांनी फाड फाड इंग्रजीमध्ये या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आपण वीज चोरी पकडण्यासाठी आलात तर आधी वीज जोडणी द्या आपण त्यासाठी तयार आहोत असे त्यांनी ठासून सांगितलेले होते.
अशाच स्वरूपाच्या इतरही घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत मात्र शेतकऱ्यांने इंग्रजीतून झापलेले हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आणि महावितरण उपविभागाचे मुख्य अभियंता संजय बालटे, सहाय्यक अभियंता सुनील पवार यांनी या शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना कृषी पंपाचे वीज कनेक्शन तात्काळ जोडून त्यांच्या मागणीला अखेर न्याय दिलेला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना इंग्रजीत सांगितलेले लवकर समजले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.