
नगर महापालिकेचा अनागोंदी कारभार नगरकरांपासून लपून राहिलेला नाही. महापालिकेचा सर्वाधिक मलाईदार म्हणून कुख्यात विभाग असलेल्या नगररचना कार्यालय येथील कर्मचाऱ्यांना कुणाचा काही धाक राहिलेला आहे की नाही अशी सध्या परिस्थिती आहे. मनपा आयुक्त यांनी अतिक्रमणे काढण्यास संदर्भात वारंवार आदेश देऊन देखील कर्मचारी अद्यापही सुस्तावलेले असल्याचे दिसून येत आहे . मुजोर कर्मचारी आयुक्तांना देखील दाद देत नसल्याचे दिसून येत आहे.
नगर चौफेर प्रतिनिधीने तेवीस तारखेला दुपारी कार्यालयीन काळात भेट दिली असता एकही कर्मचारी जागेवर उपस्थित दिसून आला नाही. नगररचना विभागाचे अधिकारी रा. ल. चारठाणकर हेच आपल्या कार्यालयात आढळूनच येत नाहीत त्यामुळे इतरही कर्मचाऱ्यांनी त्यांचे अनुकरण करत कार्यालयात उपस्थित न राहण्याचे ठरवले आहे की काय ? असा प्रश्न नगरकरांना पडल्याशिवाय राहणार नाही.
राल चारठाणकर यांनी काही दिवसांपूर्वी नगररचना विभागात प्लॅन मंजूर करून घेण्यासाठी कोणीही जर लाचेची मागणी केली तर आपल्याशी लेखी संपर्क करावा असे आवाहन केले होते मात्र त्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्वतःचा कुठलाही नंबर किंवा ईमेल एड्रेस ही दिलेला नव्हता त्यामुळे प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी नागरिक पोहचतात तर चारठाणकर बहुतांश वेळा कार्यालयात आढळून येतच नाहीत त्यामुळे परिपत्रकाचा सोस तरी नक्की कशासाठी सुरु आहे ?.








नगर चौफेर प्रतिनिधीने कार्यालयीन वेळेत पाहणी केली असता नगररचना अधिकारी सातपुते यांच्या व्यतिरिक्त एकही कर्मचारी कार्यालयात आढळून आला नाही. आवक-जावक विभागापासून तर नगररचना कार्यालयापर्यंत सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या आणि एकही कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता आणि चारठाणकर हे तर फक्त एक ते दोन तासच कार्यालयात असतात ते देखील यावेळी आढळून आले नाहीत. मनपा आयुक्तांचे अधिकारी आणि कर्मचार्यांवर काही नियंत्रण राहिलेले आहे की नाही ? असा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे .