
भारताने आज एक मोठा इतिहास रचला आहे. इस्रोचं चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वीपणे लँड झालं आहे. चांद्रयान 3 लँडिंगसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या मोहिमेकडे लागून राहिले होते. इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या निमित्तानं पृथ्वीवरील पहिलाच कृत्रिम उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची किमया घडली आहे. अमेरिका, चीन आणि पूर्व सोवियत संघामागोमाग चंद्रावर जाणारा भारत चौथा देश ठरला आहे.
चांद्रयान 3 श्रीहरीकोटा इथून 14 जुलैला चंद्राच्या दिशेने झेपावलं. चांद्रयान 3 ने अनेक अवघड टप्पे यशस्वीरित्या पार केले. चंद्रयान 3 कडून वेळोवेळी फोटो पाठवण्यात आली. त्यामुळे सर्वसामन्य भारतीयांची उत्सुकता आणकी वाढू लागली. चांद्रयान 3 लँड होण्याच्या काही दिवसांआधीच रशियाचं लुना-25 हे यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळलं मात्र भारताच्या शास्त्रज्ञांनी आपलं कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता दाखवून दिली. शास्त्रज्ञांनी 140 कोटी भारतीयांचा विश्वास सार्थ ठरवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून , ‘ प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे…बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवलं आहे…‘चंद्रयान ३’ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले आणि या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला…या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चंद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले.‘चंद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते.
भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे.या मोहिमेत इस्त्रोसोबतच देशातील काही खासगी कंपन्यांचा देखील सहभाग होता, ज्यांचा आम्ही नुकताच ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मान् केला त्या रतन टाटाजी यांच्या टाटा स्टील कंपनीमध्ये बनविण्यात आलेल्या क्रेनचा वापर रॉकेट लॉन्चसाठी करण्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रयान ३ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे. भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे आजचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चंद्रयान ३ मोहीमेमधील विक्रम लॅन्डरच्या यशस्वी लॅंडिंगबद्दल समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो… ‘ असे म्हटलेले आहे .