
उत्तर प्रदेश पोलिसांची पूर्ण देशात प्रतिमा खराब झालेली असून असाच एक प्रकार कानपुर इथे समोर आलेला आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर झालेल्या प्रकारानंतर एका गरीब भाजीविक्रेत्यावर दोन्ही पाय गमावण्याची वेळ आली असून पोलिसांच्या या कृत्याचा जोरदार निषेध सोशल मीडियावर केला जात आहे. प्रचंड रक्तस्त्राव झाल्यानंतर या तरुणाची प्रकृती गंभीर असून सध्या तो लखनऊ येथे उपचार घेत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, असलान असे या भाजीविक्रेत्यांचे नाव असून रस्त्याच्या कडेला तो भाजी विकत होता त्यावेळी पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी त्याचा तराजू रेल्वे रुळावर फेकला. तो आणण्यासाठी भाजीविक्रेता गेलेला असताना रेल्वेने त्याला धडक दिली आणि त्यात त्याचे दोन्ही पाय कापले गेले. पोलिसांच्या या कृत्याचा जोरदार निषेध सोशल मीडियावर केला जात असून उत्तर प्रदेश पोलिसांची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळली गेली आहे तर हेड कॉन्स्टेबल राकेश कुमार यास निलंबित करण्यात आले आहे.