उद्धव ठाकरे गटाच्या नवीन चिन्हाची खिल्ली, ‘ मशाल नव्हे हा तर आईस्क्रीमचा कोन ‘

शेअर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वादातून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले असून उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलेले आहे हे तर दोन्ही गटांना शिवसेना नावाचा वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ‘ आणि शिंदे गटाला ‘ बाळासाहेबांची शिवसेना ‘ असे नाव दिलेले आहे. शिवसेनेचे नवीन चिन्ह अवघ्या काही दिवसात तळागाळातल्या शिवसैनिकापर्यंत पोहोचले असून भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नवीन चिन्हाची खिल्ली उडवली आहे.

नितेश राणे म्हणाले की, ‘ ती मशाल नव्हे तर आइस्क्रीमचा कोन आहे. उद्धव ठाकरेंचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही कारण त्या माणसामधील आग संपलेली आहे ‘, असे देखील ते पुढे म्हणाले. नितेश राणे यांच्या या विधानावर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अंधेरीच्या पोटनिवडणुकीत ‘ उद्धव ठाकरे यांची पेटलेली मशाल आम्ही विझवण्याचे काम करणार ‘ असा टोला हाणलेला असून आम्ही भाजपच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि या निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येणार असे देखील म्हटले आहे.


शेअर करा