उपोषणाला बसलेल्या पारधी बांधवाने घरासाठी गमावले प्राण , जळजळीत वास्तव

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली असून कडाक्याच्या थंडीत उपोषण सुरु असताना एका पारधी बांधवाने आपले प्राण गमावले आहेत. बीड येथील हे प्रकरण असून सदर घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे . बीड तालुक्यात वासनवाडी येथील हे प्रकरण असून अप्पाराव पवार यांचा बीड जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषण करताना मृत्यू झाला आहे. गेली काही वर्षे अप्पाराव महसूल आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होते मात्र अखेर त्यांचा उपोषणातच मृत्यू झालेला आहे .

काय आहे प्रकरण ?

बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात पवार कुटुंब ३५ वर्षांपासून राहत आहे. एकूण ४ कुटुंबे घर बांधत होती.२०२० साली त्यांना घरकुल मंजूर झाले. ग्रामसेवकाने ८ अ उतारा दिला.बांधकामासाठी पहिला हफ्ता देखील मिळाला मात्र बांधकाम साहित्य खरेदी केले व खोदायला सुरुवात केली तेव्हा एका राजकीय व्यक्तीने ही जागा आमची आहे म्हणत बांधकाम थांबवले.

पीडित कुटुंबाला गेली अनेक वर्षे मदत करणारे तत्वशील कांबळे यांनाही या विषयात लक्ष घालू नका असे निरोप आले मात्र तरीदेखील तत्वशील यांनी त्यांना मदत केली. मला घरकुल मंजूर केले आहे , ती जागा मिळत नसेल तर दुसरीकडे जागा द्या पण घरकुल बांधून द्या,न्याय द्या म्हणून अप्पाराव सतत आंदोलने करत राहिले. त्यांनी मुंबईत उपोषण केले, औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त यांच्यासमोर उपोषण केले. पण निर्णय झाला नाही. घर नसल्याने हे कुटुंब औरंगाबाद येथे पुलाखाली राहून फुगे विकून गुजराण करत होते तर बीडला जाऊन सतत आंदोलन देखील करत होते मात्र गावाने देखील कोणतीच मदत केली नाही.

पारधी समूहासाठी काम करणारे अशोक तांगडे म्हणाले की जिल्हाधिकारी इतर जागा आपण त्यांना खरेदी करून देऊ असे म्हणत पण पारधी घरे बांधणार म्हटल्यावर कोण जमीन देईल ? तत्वशील यांनी जागा बघितल्या पण यश आले नाही. शेवटी वैतागून अप्पाराव यांनी उपोषण सुरू केले होते. यापूर्वी देखील उपोषणस्थळीच सुनेची प्रसूती झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असतांना नातवाचा देखील डेंग्युमुळे मृत्यू झाला होता व आज स्वतः अप्पाराव यांनी देखील प्राण गमावले आहेत.


शेअर करा