एक्सक्लुजीव्ह : माझ्या ताईला न्याय मिळेल का ? , सगळाच घटनाक्रम संशयास्पद

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा इथे उघडकीला आलेली असून एका विवाहितेची प्रकृती बिघडल्याचा फोन महिलेच्या माहेरच्या व्यक्तींना 31 ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास आला होता त्यानंतर पुन्हा अवघ्या पाच मिनिटानंतर फोन करून विवाहितेच्या माहेरच्या व्यक्तींना तुमच्या मुलीने आत्महत्या केलेली आहे असे सांगण्यात आले. माहेरच्या मंडळींनी तिच्या सासरी धाव घेतली त्यावेळी ती मयत अवस्थेत आढळून आली. आपली मुलगी अजिबात आत्महत्या करण्यासारखी नव्हती त्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याचा संशय माहेरच्या व्यक्तींनी व्यक्त केला असून या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, लक्ष्मी अनिल गादेकर ( राहणार सटाणा जिल्हा नाशिक ) असे मयत महिलेचे नाव असून सदर महिलेचे पुणे येथील रविवार पेठ इथे माहेर आहे. सहा ते सात वर्षापूर्वी त्यांचा अनिल गादेकर नावाच्या व्यक्तीसोबत विवाह झालेला होता. अनिल गादेकर याचे याआधी देखील एक लग्न झालेले असून ही माहिती महिलेच्या माहेरच्या व्यक्तींपासून दडवण्यात आली आणि अनिल गादेकर याने दुसरा विवाह केला. लग्न झाल्यापासूनच अनिल गादेकर, त्याची आई, त्याचे वडील आणि अनिल याचा भाऊ अर्थात विवाहितेचा दीर यांनी छळ सुरू केला असे माहेरच्या व्यक्तींचे म्हणणे आहे.

31 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास तुमच्या मुलीची प्रकृती बिघडली आहे असा अचानकपणे फोन आल्यानंतर माहेरचे व्यक्ती गडबडून गेले आणि त्यानंतर अवघ्या पाच मिनिटात तुमच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे असे सांगण्यात आल्यानंतर माहेरच्या व्यक्तींनी जागीच हंबरडा फोडला. तात्काळ त्यांनी सटाणा येथील मुलीचे सासर गाठले त्यावेळी तिच्या गळ्याभोवती व्रण होते तसेच तिच्या पाठीवर मारहाण केल्याच्या खुणा होत्या असा दावा विवाहितेचे भाऊ विनायक इंदापूरकर यांनी केला आहे . पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला त्यावेळी गळफास घेतल्यामुळे पाठीजवळ रक्त साकळले असे पोलिसांनी माहेरच्या व्यक्तींना सांगितले असून अद्यापपर्यंत पोस्ट मार्टेम अहवाल आलेला नाही.

माहेरच्या व्यक्तींनी सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी विवाहितेचा पती, दीर सासू-सासरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून आमची मुलगी ही आत्महत्या करण्यासारखी नव्हती. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी खोलीमध्ये तिचा पती आणि दोन मुले आणि ती स्वतः इतकीच मंडळी होती. बंद खोलीत काय घडले हे समोर आले पाहिजे. जर हा खुनाचा प्रकार नाही तर आमच्या ताईच्या मुलांना देखील तिच्या अंत्यविधीत का सामील होऊ दिले नाही असा देखील प्रश्न माहेरच्या मंडळींनी केलेला असून झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे अशी मागणी केलेली आहे.


शेअर करा