
बहुतांश सरकारी कार्यालयात तसेच सरकारी मालमत्ता असलेल्या ठिकाणी देवतांचे आणि धार्मिक प्रदर्शन अशा स्वरूपाची प्रतीके चिटकवलेली दिसून येतात या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय असा समोर आलेला असून एसटी महामंडळाच्या बसेसच्या काचेवर देवी आणि देवतांचे फोटो तसेच इतरही कोणतेच पोस्टर्स लावण्यास लावू नयेत असे आदेश काढण्यात आलेले आहेत. एसटी महामंडळाने नागपूर विभागाला अशा प्रकारचे परिपत्रक लिहून एसटीच्या काचा स्वच्छ असाव्यात त्यामुळे रस्त्यावरील वाहने स्पष्टपणे दिसतील आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल असे म्हटलेले आहे.
एसटी महामंडळाने सध्या एसटी बसेस आणि बसस्थानक परिसर स्वच्छ मोहीम सुरू केलेली असून हा त्याच योजनेचा भाग आहे. ग्रामीण भागात एसटी मोठ्या प्रमाणात पोहोचते तसेच शहरात देखील एसटीची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. एसटीच्या काचेवर वेगवेगळ्या पद्धतीचे स्टिकर लावून वाहनचालक यांच्यासोबतच अनेक पोस्टरबाज देखील एसटी विद्रूप करतात त्यामुळे एसटीचा प्रवास धोकादायक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
एसटीचा प्रवास सुरक्षित करण्यात यावा यासाठी एसटी चालवणाऱ्या चालकांना देखील प्रशिक्षित करण्यात येते आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील एसटी प्रवासात कमी असते. प्रत्येक तिकिटामागे एक रुपयांचा विमा देखील एसटी उतरवते त्यामुळे दिवसाला तब्बल दहा लाख लोकांचा विमा उतरवला जात असतो . सुखकर असणारा एसटी प्रवास पोस्टरबाज आणि या स्टिकरमुळे धोकादायक ठरत असून एसटी महामंडळाने आता एसटीमधील काळी जादू, वशीकरण, शाही दवाखाना, लैंगिक समस्या या संदर्भातील देखील जाहिरातींवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांमधून वाढलेली आहे.