कोथिंबीर फुकट वाटताना शेतकऱ्याचे डोळे पाणावले पण ‘ पांढरपेशा बगळ्यांनी ‘ काय केलं ? :

शेअर करा

गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव चक्क भाजीपाला फुकट वाटत असल्याचे चित्र राज्यात दिसून येत असून एक शेतकरी कोथिंबीर फुकट वाटत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे हे सांगण्यासाठी हे दृश्य पुरेसे आहे. मनमाडमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला असून धक्कादायक म्हणजे फुकट घेणाऱ्यांना देखील स्वतःहून या शेतकऱ्याला काही मदत करावीशी वाटलेली नाही.

उपलब्ध माहितीनुसार, दिलीप सांगळे असे या शेतकऱ्याचे नाव असून मनमाड बाजार समितीत नेहमीप्रमाणे दिलीप सांगळे हे शेतकरी कोथिंबीर घेऊन विक्रीसाठी दाखल झाले होते मात्र बरेच तास उलटून गेले तरी व्यापऱ्याने सांगळे यांची कोथिंबीर खरेदी केली नाही त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने सर्व कोथिंबीर परत गाडीत भरून रस्त्यावर आणली आणि लोकांना फुकट वाटण्यास सुरुवात केली.. हजारो रुपये खर्च करून कष्टाने पिकवलेली कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आल्याने दिलीप सांगळे यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या होत्या मात्र फुकट घेणाऱ्या नागरिकांना त्याचे सोयसुतकही नव्हते.

बराच काळ रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना दिलीप सांगळे यांनी चक्क स्वत:हुन कोथिंबीर फुकट वाटली अन अनेक नागरिकांनी ती हसत हसत घेत निघून गेले. दिलीप सांगळे यांच्या डोळ्याचा कडा पाण्याने ओल्या झालेल्या असतांनाही कुणी त्यांच्या खिशात दहा वीस रुपये बळजबरीने घातले नाहीत. काही व्यक्तींनी चक्क तर फोटो सेशन करताय का ? म्हणत शेतकऱ्याला हिणवण्याचे कामही केले असून त्यामुळे शेतकऱ्याच्या वाट्याला आलेले दु:ख मन सुन्न करणारे आहे. फुकट भाजी वाटत असतांनाही नागरिक शेतकऱ्याची चेष्टा करत असल्याने त्याचे मोठं दु:ख आहे.

राज्यातील सरकार बदललेले असले तरी शेतकरी बांधवांना कुठलाच दिलासा मिळालेला नाही उलट पालेभाज्या , कांदा आणि द्राक्ष पिकांचे दर कोसळलेले दिसून येत आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ राहिलेला नाही अजूनही ही माध्यमे सत्ता संघर्षातच लोळत पडलेली आहे दुसरीकडे शेतकरी बांधवांचे जगणे असाहाय्य झालेले असून पिकाला भाव नाही अन केलेला खर्च देखील निघत नाही त्यामुळे आता करायचे तरी काय ? असा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर उभा राहिलेला आहे .


शेअर करा