
नेवासा तालुका सहकारी दूध उत्पादक संघातील वीज चोरी प्रकरणी या संघाचे अध्यक्ष व सध्या कोमात असलेले गडाख यांचे पुत्र प्रशांत यांच्यासह संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासंबंधी कार्यकर्ता मेळावा इथं बोलताना यशवंतराव गडाख यांनी खंत व्यक्त केली असून कौटुंबिक दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करणे धीर देणे ही आपली भारतीय संस्कृती असताना तालुक्यातील विरोधकांनी मात्र त्याचे राजकीय भांडवल करुन त्रास देण्याचा उद्योग चालविला आहे. आपण तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर राजकारण केले, असंख्य चढउतार पाहिले, परंतु एवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण पाहिले नाही असे म्हटलेले आहे
काय म्हणाले यशवंतराव गडाख ?
वीज कंपनीच्या भरारी पथकाने अलीकडेच ही कारवाई केली आहे. या दूधसंघात सुमारे सव्वा कोटी रुपयांची वीज चोरी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून संघ बंद आहे मात्र दहा वर्षांपूर्वी वीज चोरी झाल्याचे पथकाचे म्हणने आहे. अध्यक्ष प्रशांत कोरोनाच्या काळात आजारी पडले आणि ते कोमात गेले असून अद्यापही बरे झालेले नाहीत. प्रशांत गडाख कोमात असताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला असून जर ते आजारी नसताना असा प्रकार केला असता तर त्यांनी तुमची भिंगरी केली असती.
विरोधकांकडे सत्ता असतानाच्या काळात विविध संस्था उभारणीच्या माध्यमातून रचनात्मक कामे करायची सोडून हजारो लोकांचे प्रपंच अवलंबून असलेल्या चांगल्या चालू संस्था मोडकळीस आणण्यासाठी त्यांनी त्यांची राजकीय ताकद खर्च केलेली आहे. अशाच द्वेषाधारित राजकारणातूनच महाभारत घडलेले होते. तालुका दूध संघाच्या वीज मिटरची चावी महावितरण अधिकाऱ्यांच्या ताब्यात असताना वेळोवेळी झालेल्या तपासणीत त्यांना वीज चोरी कधीही आढळली नाही. मात्र दहा वर्षांपूर्वीच्या कथित वीज चोरीचा दाखला देऊन पालघरच्या अधिकाऱ्यांमार्फत अचानक दंड ठोठावून पोलीसांत गुन्हाही दाखल कसा झाला? याचे कोडे न उलगडण्याइतपत जनता खुळी राहिलेली नाही , असे देखील त्यांनी पुढे म्हटलेले आहे.