
काही वर्षांपूर्वी रण चित्रपटात असलेली कौआ बिर्याणी चांगलीच चर्चेत आलेली होती. शहरातील कावळे मारून अत्यंत कमी भावात बिर्याणी देण्याचा हा प्रकार चित्रपटातून दाखवण्यात आला होता . असाच काहीसा प्रकार मुंबईत समोर आलेला असून आपल्या घराच्या इमारतीच्या गच्चीवर कबुतरे पाळून त्यांचे मांस हॉटेलमध्ये विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
सायन येथील एका गृहनिर्माण संस्थेत राहणारा अभिषेक सावंत हा त्याच्या घराच्या गच्चीवर कबुतरे पाळत होता. सदर प्रकरणी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली असून अभिषेक आणि त्याच्यासोबतचे सात सहकारी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे अभिषेक हा मोठ्या कबुतरांना मारून त्यांचे मांस जवळपासच्या हॉटेलमध्ये विकत होता. मार्च महिन्यापासून त्याचा हा उद्योग सुरू होता. सोसायटीच्या गच्चीचा दमदाटी करून तो वापर करायचा त्यामुळे इतरही सदस्य त्याच्याविरोधात बोलत नव्हते.
तक्रारदार यांनी यासंदर्भात फोटो आणि पुरावे आपल्याकडे आहेत असे सांगितले आहे. सावंत हा लहान कबुतरे पाळायचा आणि ती मोठी झाल्यानंतर त्यांना मारून त्यांचे मांस जवळपासचे हॉटेल आणि बियर बार येथे विकत होता. सदर हॉटेलचालक कबूतर बिर्याणी बनवून ग्राहकांना खाऊ घालायचे असेही तक्रारदार यांचे म्हणणे असून आयपीसी कलम 428 आणि 447 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक याने मात्र हे दावे फेटाळून लावले असून तक्रारदार व्यक्ती यांना इतर सर्व सदस्यांबाबत सोसायटीत अडचण आहे असे म्हटलेले आहे. कबुतरांची हत्या करणे हा गुन्हा असून जंगली कबुतरांना कायद्यांतर्गत संरक्षण देखील आहे हे मात्र तरीही हा प्रकार सुरू होता असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.