खाकीला काळिमा..पोलीस निरीक्षक पदावरील व्यक्तीकडून ‘ तसली ‘ मागणी अन त्यानंतर..

शेअर करा

पोलीस म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे कायद्याचे पालन करणारा व्यक्ती अशी एक प्रतिमा जनतेच्या मनात उभी राहते मात्र काही व्यक्तींकडून या प्रतिमेला डागळण्याचे काम केले जात असून असाच एक संतापजनक प्रकार हिंगणघाट शहरात समोर आलेला आहे. हिंगणघाट शहरात तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका 24 वर्षीय पीडित तरुणीला तिची तक्रार दाखल करून न घेता चक्क तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून वारंवार तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. हिंगणघाट पोलीस ठाण्यात याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरु आहे .

उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणी ही पाच ऑगस्ट 2021 रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात काही कारणास्तव तक्रार देण्यासाठी गेलेली असताना तत्कालीन पोलीस निरीक्षक संपत चव्हाण याने ‘ तुझी मदत करतो पण माझ्याशी मैत्री करशील का ? ‘, असा प्रश्न विचारला. पीडित मुलीने यास नकार दिल्यानंतर मी तुझी तक्रार घेणार नाही असे देखील तो म्हणाला असे पिडीतेचे म्हणणे आहे . हतबल झालेल्या तरुणीने अखेर मी वरिष्ठांकडे तक्रार करेल असे म्हणत तिथून निघून गेली .

19 ऑगस्ट रोजी संपत चव्हाण हा पीडित मुलीच्या घरी गेला आणि त्याने ‘ तुझी तक्रार नोंदवतो पण वरिष्ठांकडे तक्रार करू नकोस ‘ असे सांगितले मात्र त्यानंतर काही काळ गेल्यावर पिडीतेने पुन्हा चव्हाण यास तक्रार घेण्यासाठी सांगितले त्यावेळी त्याने जर तक्रार नोंदवायची असेल तर माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर असे म्हणत तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली असे पीडीतेचे म्हणणे आहे. आज नाही उद्या तो तक्रार नोंदवून घेईल अशी तिला आशा होती मात्र त्याने केवळ आपले लैंगिक शोषण केले असेही तिने पुढे म्हटले आहे .

तत्कालीन पोलीस निरीक्षक असलेला संपत चव्हाण एप्रिल 2022 पर्यंत पीडित तरुणीचे लैंगिक शोषण केले असल्याचा आरोप तिने तक्रारीत केलेला असून अखेर पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हिंगणघाट पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असून पोलीस दलात यामुळे खळबळ उडालेली आहे. पोलीस निरीक्षक सारख्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचे जर असे वर्तन असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची हा देखील एक प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे.


शेअर करा