गडकरी साहेब एकदा मनमाड रोडवर गाडीने प्रवास करून दाखवा , अनोख्या शैलीत आंदोलन

शेअर करा

नगर जिल्ह्यातील सर्वाधिक खराब रस्ता म्हणून नगर-मनमाड रस्त्याची ओळख आहे. साई भक्तांची प्रचंड गर्दी असणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खाचखळगे असून अनेकदा अपघात देखील झाले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या नावाने एक फ्लेक्स देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. देहरे येथे टोल नाक्यावर हा फ्लेक्स लावलेला होता मात्र त्यानंतरही कुठलीच कारवाई झाल्यानंतर अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने या रस्त्याचे काम व्हावे यासाठी आंदोलन करत आहेत.

कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते असलेले एडवोकेट नितीन पोळ यांनी नगर-मनमाड रस्त्यावर खड्ड्यात बसून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्यावरून आपण एकदा प्रवास करून पहा यासाठी आमंत्रण पत्र लिहिलेले आहे. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून नितीन गडकरी हे कितपत दखल घेतात हे येत्या काळात पहावे लागेल.

पत्रात म्हटले आहे की गेल्या सात वर्षांपासून आपण केंद्रीय विकास मंत्री म्हणून काम पाहत आहात. या कालावधीत आपण अनेक रस्त्यांची उड्डाणपुलांची देखील उद्घाटने केलेली आहेत. महाराष्ट्रात आपण बांधकाम विकास मंत्री असताना आपण रस्त्यांचे आणि पुलांची कामे मार्गी लावली आहेत. देशाचा विकास हा रस्त्यांच्या विकासावर अवलंबून असतो असे आपण नेहमी सांगता मात्र कोपरगाव नगर या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.

रस्त्याच्या कामाला निधीही मंजूर आहे मात्र रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. अनेकदा या रस्त्यावर अपघात होऊन मृत्यूही झाले आहेत असे असताना आपल्याला एकच विनंती आहे की आपण एकदा वेळ काढून रस्त्यावरील खड्ड्यांना भेट द्यावी. येताना हेलिकॉप्टर विमानाऐवजी गाडीने यावे आणि या रस्त्यावरून प्रवास करावा’ असे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे .


शेअर करा