
गुजरातचा घोंगडीवाला बाबा राजस्थानमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत असून सोशल मीडियावर आता सध्या या बाबाचे चक्क छत्तीसगडचे माजी गृहमंत्री असलेले आणि भाजप नेते रामसेवक पैकरा यांच्यासोबत असलेले सध्या फोटो व्हायरल होत आहेत. छत्तीसगडचे माजी गृहमंत्री यांनी मधुमेह असल्याकारणाने या बाबाच्या दरबारात त्यांनी हजेरी लावली होती त्यावेळी बाबांनी त्यांना साखर खाऊ घातली. बाबाची ही कृती अंधश्रद्धा आहे असे मला वाटत नाही , ‘ असे त्यांनी त्यावेळी म्हटलेले होते. विशेष म्हणजे मधुमेह असताना देखील बाबांनी त्यांना साखर खाऊ घातली.
2017 सालचे हे प्रकरण असून छत्तीसगडचे त्यावेळचे गृहमंत्री यांनी यावेळी, ‘ मी माझ्या मतदार संघात बलरामपूर येथे जनसंपर्क यात्रेला गेलो होतो तेव्हा मला हजारो भक्त बाबांसाठी उभे असलेले दिसले. मी तिथे उभे राहून ते रुग्णांशी कसे वागतात ते पाहिले आणि नंतर माझा मधुमेह बरा व्हावा म्हणून त्यांचा सल्ला घेतला. बाबांनी मला बरा म्हणून चमचाभर साखर देऊ केली पण काहीही फी आकारली नाही. त्यांची कृती अंधश्रद्धा आहे असे मला वाटत नाही , ‘ असे म्हटले होते तर काँग्रेस कमिटीचे प्रमुख भूपेश भागेल यानो त्यावेळी , ‘ ग्रामीण भागातील लबाडांच्या विरोधात ज्या व्यक्तीने काम केले तो स्वतः मधुमेह बरा करण्यासाठी एका बाबाची भेट घेत आहे ‘ असे सांगत या बाबावर कारवाईची मागणी केलेली होती.
गणेश भाई गुर्जर असे या बाबाचे खरे नाव असून मूळचा तो गुजरात येथील रहिवासी आहे. बाबागिरीचे गुजरात मॉडेल राजस्थानमध्ये चांगलेच धुमाकूळ घालत असून हा बाबा कंबलवाले बाबा नावाने परिसरात ओळखला जातो. त्याच्या खांद्यावर एक काळी घोंगडी आणि डोक्यावर काळी पगडी असते. आपल्या घोंगडीने आपण अनेक जणांना आजारातून बरे करतो असा या बाबाचा दावा आहे.
बाबाच्या म्हणण्यानुसार, माझ्या घोंगडीमध्ये आध्यात्मिक शक्ती आहे. ही घोंगडी मला आंब्याच्या झाडावर मिळालेली असून ही घोंगडी ज्या कुणाच्या अंगावर मी टाकेल तो बरा होईल. देवाने मला अशी अद्भुत शक्ती दिलेली आहे. देवाच्या आशीर्वादाने ही सिद्धी मला प्राप्त झालेली असून कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर घोंगडी टाकल्यानंतर आणि त्याची नाडी आणि शीर पाहिल्यानंतर मला आजाराची माहिती होते. 32 वर्षांपासून मी हे काम करत असून शिबिर लावून आपण नागरिकांवर उपचार करतो , ‘ असे म्हटलेले आहे.
शिबिरात येण्यासाठी सामान्य नागरिकांना 50000 पासून एक लाख रुपये आकारण्यात येतात आणि तिथे आल्यानंतर जेवणाचे ताट, बिसलरी पाणी अशा अनेक गोष्टी शिवाय वेगवेगळे चहा आणि यंत्र विकून या बाबाची मोठ्या प्रमाणात कमाई होते. हवन करण्यासाठी नारळांची गरज पडते त्यामुळे नारळांचा देखील व्यापार करून हा बाबा मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहे. शिबिर व्यवस्थापनात देखील या बाबांचे भक्त कार्यरत असून हे व्यवस्थापन करण्यासाठी एक रुपयाचा देखील खर्च या बाबाकडून केला जात नाही . साधेभोळे नागरिक सहजपणे अशा व्यक्तींच्या जाळ्यात अडकत असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे.