
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार डोंबिवली इथे समोर आलेला असून निळजे गावातील एका तरुणाने पत्रकार होण्याच्या उद्देशाने मास मीडियाचा कोर्स केलेला होता त्यानंतर त्याला एका वृत्तपत्रात नोकरी देखील लागली मात्र दरम्यानच्या काळात त्याला डान्सबारचे व्यसन लागले आणि झटपट पैसे कमावण्याच्या नादात चक्क तो घरफोड्या करणारा बनला मात्र पोलिसांनी त्याला अवघ्या काही दिवसात बेड्या ठोकलेल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, रोशन जाधव असे आरोपीचे नाव असून त्याने पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतलेले आहे. काही वर्ष तो एका इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होता. त्याला ताब्यात घेण्यात आले त्यावेळी त्याने आतापर्यंत आठ गुन्ह्यांची कबुली दिलेली असून त्याच्याकडून तब्बल 47 तोळे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप , एक मोबाईल फोन आणि दोन घड्याळे असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरामध्ये अज्ञात आरोपीने सुमारे 35 तोळे सोन्याचे दागिने लंपास केलेले होते त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटीच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली आणि त्यानंतर आरोपीला बेड्या ठोकल्या. रोशन जाधव याने आतापर्यंत आपण आंबिवली, टिटवाळा, शहापूर या परिसरात घरफोड्या केलेल्या असून वॉचमन ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी आपण जाऊन घरफोड्या करायचो असे म्हटलेले आहे. आलेला पैसा हा आपण डान्सबार आणि उच्चभ्रू लाइफस्टाइल जगण्याच्या उद्देशाने खर्च केला असे देखील त्याने सांगितलेले आहे.