ठेकेदार महाशय..’ हा ‘ रस्ता आहे की स्पीडब्रेकर

शेअर करा

नगर शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा अवघे नगरकर पाहत असून किरकोळ मलमपट्टीपलीकडे रस्त्यांची डागडुजी होत नसल्याचे चित्र आहे. अवघ्या काही दिवसाच्या पावसात महापालिकेचा रस्ते विकास वाहून गेलेला असून शहर पुन्हा खड्ड्यात रूपांतरीत झालेले आहे.

सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता याचे काम पावसाच्या आधी सुरू करण्यात आले होते मात्र सदर काम लवकर उरकून घेण्यात ठेकेदाराकडून दुर्लक्ष करण्यात आले आणि पावसानंतर या रस्त्याची पूर्णपणे वाट लागली. पाऊस थांबल्यानंतर या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून रस्त्याच्या कामाबाबत कामाच्या दर्जाबाबत मात्र नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

गुलमोहर रोडवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे रस्त्याचे काम व्यवस्थित होईल अशी आशा होती मात्र ठेकेदाराने रस्त्याचे काम ज्या पद्धतीने केलेले आहे त्यावर टीका केली जात असून मोठ्या साईजचे दगड या कामासाठी वापरल्याने हा रस्ता गुळगुळीत होण्याऐवजी चक्क खडबडीत झालेला आहे. सुमारे तीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम अद्यापही सुरू असून मोठ्या दगडांचा वापर केल्याने आपण नक्की रस्त्यावर चालत आहोत की पूर्ण रस्ताच स्पीड ब्रेकर करण्यात आलेला आहे , असा देखील खोचक सवाल नगरकर व्यक्त करत आहेत.

सुरुवातीला या रोडवर छोटी खडी टाकून रस्ता करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र डांबर टाकण्यात न आल्याने नागरिक घसरत असल्याने खडी उचलून इतरत्र हलवण्यात आली त्यामुळे गुलमोहर रोड हा सध्या खडखडाट रोड झालेला असून नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


शेअर करा