
सोशल मीडियावर सध्या कल्याण येथील एका प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून आयकर विभागाच्या कार्यशैलीची पोलखोल ठरणारा हा प्रकार आहे. कल्याणमधील ठाणकर पाडा येथील चंद्रकांत वरख नावाच्या एका इसमाला इन्कम विभाग विभागाकडून चक्क एक कोटी चौदा लाख रुपये भरणे बाकी आहे अशी नोटीस पाठवण्यात आलेली आहे. चंद्रकांत हे दुर्गानगर भागात राहत असून एका कुरिअर कंपनीत मासिक दहा हजार रुपयाप्रमाणे काम करतात. ते आणि त्यांची बहीण हे दोनच व्यक्ती त्यांच्या कुटुंबात आहेत.
चंद्रकांत वरख यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांच्या दरम्यान असून घरातून कामाला कामावर जाण्यासाठी ते निघालेले होते त्यावेळी इन्कम टॅक्स विभागाची त्यांना नोटीस आली आणि त्यामध्ये त्यांनी चक्क एक कोटी 14 लाख रुपये थकवलेले आहेत असे या नोटीसमध्ये म्हटलेले होते. त्यांच्या पॅन कार्डवरून मोठे ट्रांजेक्शन झालेले आहेत असा देखील इन्कम टॅक्स विभागाचा दावा असून इतकी मोठी रक्कम ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसलेला आहे. इन्कम टॅक्स विभागात गेल्यानंतर अधिकारी वर्गाने देखील पॅन कार्डचा नंबर दाखवत आपले हात वर केले त्यामुळे पोलीस ठाण्यात जाऊन चंद्रकांत वरख यांनी तक्रार दाखल केलेली आहे. रक्कम तब्बल एक कोटी 14 लाख रुपये असल्याने पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे.