
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झालेला असून या व्हिडिओबद्दल अनेक जणांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेश येथील हे प्रकरण असून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले आणि गंभीर जखमांमुळे तीन रस्त्यावर तडफडत होती मात्र नागरिकांनी चक्क तिला मदत करण्याऐवजी निर्दयतेने तीचे व्हिडिओ काढले . सदर व्हिडीओ भयावह असल्याने शेअर करण्यात आला नाही.
उत्तर प्रदेशातील कनौज येथील हे प्रकरण असून सदर अल्पवयीन मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका शेतात आढळून आली होती. अल्पवयीन मुलगी गंभीर अवस्थेत आढळून आल्याने नागरिकांनी तिथे धाव घेतली. सदर मुलगी रडत रडत त्यांच्या पुढे हात जोडून विनवणी करत असताना तिच्या मदतीसाठी कोणीही आले नाही तर नागरिकांनी चक्क तिचे व्हिडिओ काढण्यातच पुढाकार घेतला. मुलीच्या हातातून रक्त येत होते आणि तिला उभे देखील राहता येत नव्हते अशा परिस्थितीत देखील नागरिकांनी तिला मदत केली नाही.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलीचे वय 12 ते 13 वर्षांच्या दरम्यान असल्याचे दिसून येत असून अखेर एका पोलिसाला याप्रकरणी खबर देण्यात आली आणि पोलिसाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलीला आपल्या हाताने उचलत रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. पीडित मुलीला घेऊन जाणाऱ्या पोलिसाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात असून ती मरणाच्या दारात असताना व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांबद्दल सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबत गैरप्रकार झालेला असल्याची शक्यता व्यक्त केली असून एका बंगल्याच्या मागच्या बाजूला ही मुलगी मरणासन्न अवस्थेत आढळून आली होती. सीसीटीव्ही फुटेजची देखील पोलीस चौकशी करत असून या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे मात्र नागरिकांच्या देखील कृत्यावर पोलिसांनी देखील संताप व्यक्त केला असून लोकांच्या संवेदना इतक्या बोथट झालेल्या आहेत का ? असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे.