तुमची जमीन विकायची तर मला २५ लाख द्या , नेवाश्यात साखर कारखान्याच्या संचालकाला ब्लॅकमेल

शेअर करा

नेवासा दि.९ – तुमची जमीन विकायची असेल तर तुम्ही मला २५ लाख रुपये द्या नाहीतर मी तुमची बदनामी करीन . तुम्हाला जिवंत राहू देणार नाही आणि जमीनही विकू देणार नाही ? मी अनेकांना कामाला लावलेले आहे कोणालाही सोडलेले नाही ? अशी धमकी व खंडणी मागण्याची घटना भेंडा (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानाचे संचालक काकासाहेब शिंदे (वय ६८) रा.नेवासा फाटा यांना देण्यात आली असून याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात सौंदाळा येथील स्वप्रिल ज्ञानदेव गरड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार , काकासाहेब शिंदे यांची मौजे भेंडा बुद्रुक शिवारात (गट नंबर 254/2, गट नंबर 255 व गट नंबर 256) या शेतजमीन मिळकती आहेत आणि त्यांच्या मिळकती शेजारी स्वप्निल ज्ञानदेव गरड याची मिळकत आहे.स्वप्रिल गरड याचा शिंदे यांच्या मिळकतीशी कुठलाही संबंध नाही. स्वप्रिल गरड हा निष्कारणरित्या शिंदे यांना त्रास देण्यासाठी त्यांच्या मिळकतीचे गट नंबर 255 चे उताऱ्याचे इतर हक्कात असलेले पोकळीस्थ नावाचे आधारे शिंदे यांना ब्लॅकमेल करण्याचा व त्यांचे चारित्र्यहनन तसेच बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .

स्वप्निल गरड याने दि.25 जून 2023 रोजी काकासाहेब शिंदे यांची बदनामी व्हावी तसेच त्यांचे आर्थिक नुकसान व्हावे या उद्देशाने व्हाट्सअॅपवर असलेले शेतकरी राजा कृषी मार्केट या ग्रुपवर शिंदे यांची शेतजमीन मिळकत गट नंबर 254/2, 255 आणि 256 येथील ही विकावयास काढलेली असल्याने व गरड यास ही माहीत असल्याने खोट्या प्रकारचा मेसेज “मौजे भेंडा बुद्धक तालुका नेवासा येथील गट क्रमांक 254/2 आणि 255 मधील शेतजमीन विक्रीला असून सदर शेतजमीन ही वादातील आहे तसेच इतर अनेक उणीवा असलेली शेतजमीन आहे तरी सदरील शेतजमीन कुणीही विकत घेऊ नये तुमची फसवणूक होऊ शकते . सदरची जमीन वादातील असल्यामुळे मूळ मालकाने विक्रीस काढलेली आहे” असा खोटा मेसेज प्रसारित करत शिंदे यांच्याकडे २५ लाख रुपयाची मागणी केली . काकासाहेब शिंदे यांच्या मालकीहक्काच्या जमिनीत पाणी धरण्यास गेलेल्या सालगड्यांनाही गरड हा धमकी देत असल्याचे फिर्यादीत शिंदे यांनी म्हटले असून नेवासा पोलीस ठाण्यास गरड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा