
देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून कोरोना संकट संपल्यानंतर देखील हरियाणातील गुरुग्राम येथे एका महिलेने मुलाला कोरोनाच्या भीतीने तब्बल तीन वर्षांपासून घरात डांबून ठेवण्याचे समोर आलेले आहे. तिच्या अशा वर्तणुकीला कंटाळून पतीने अखेर पोलिसात धाव घेतली आणि त्यानंतर या मुलाची सुटका करण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलगा हा आता अकरा वर्षांचा झाला असून त्याची आई त्याला कोरोनाच्या भीतीने शाळेत जाऊ देत नव्हती. त्याचे शिक्षण देखील थांबलेले होते. पत्नीला या संदर्भात पतीने वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तिने काहीही ऐकून घेतले नाही. मुलाची सुटका करून त्याला आता मानसोपचार तज्ञाकडे पाठवण्यात आलेले आहे.मुलाची आई ही कोरोनाच्या भीतीने घरात देखील कुणाला प्रवेश करू देत नव्हती तर पतीला देखील तिने दुसरीकडे राहायला जा असे सांगितले होते त्यानंतर तो भाड्याच्या घरात राहत होता.
जेव्हापासून कोरोना संकट सुरू झाले तेव्हापासून ही महिला कधीही घराबाहेर पडली नाही आणि आपल्या मुलाला देखील तिने घराबाहेर जाऊ दिले नाही. घराची साफसफाई देखील ती करत नसल्याने घरात दुर्गंधी पसरलेली होती असे शेजाऱ्यांनी सांगितलेले असून आपला मुलगा आजारी आहे असे ती शेजाऱ्यांना बोलायची मात्र घरामध्ये कुणालाही प्रवेश करू देत नव्हती. आपल्या मुलाच्या शिक्षणाचे नुकसान होत असल्याने अखेर या पतीने पोलिसात धाव घेत त्याची सुटका केलेली आहे.