
महाराष्ट्रात एक अत्यंत संतापजनक अशी घटना अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील धामणदरी परिसरात समोर आलेली असून एका दुर्गम गावात जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडलेली आहे. इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या चार विद्यार्थिनींवर दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला असून गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. संतप्त पालकांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुधाकर रामदास ढगे ( वय 53 ) आणि राजेश रामभाऊ तायडे ( वय 45 दोघेही राहणार अकोला ) अशी आरोपींची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका गावात इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग असून त्या वर्गामध्ये फक्त चार मुली आणि पाच मुले शिकत आहेत. सदर शाळेवर दोनच शिक्षक नियुक्त होते त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवत पालक मुलींना शाळेत पाठवत असत . शिक्षकी पेशाला काळीमा फासत त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून या चारही मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
सातत्याने असा प्रकार होत असल्याने मुली घाबरून गेल्या आणि त्यांनी शाळेत जाणे बंद केले. पालकांनी त्यांना खोदून माहिती विचारली त्यावेळी त्यांनी जे काही सांगितले ते ऐकल्यानंतर पालकांच्या पायाखालील वाळूच सरकली त्यानंतर एका पालकाने इतर पालकांशी देखील संपर्क केला त्यावेळी चारही ठिकाणी असा प्रकार घडला असल्याचे समोर आल्यानंतर पालकांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात शिक्षकांच्या विरोधात तक्रार दिली.
ठाणेदार संजय सोळंके यांनी तात्काळ दोन्ही शिक्षकांना अटक केली असून त्यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असून ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.