नगरमधून जाताना नवीन ड्रेस अन मग.., आरोपीला अखेर जन्मठेप

शेअर करा

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी एक संतापजनक अशी घटना बीड जिल्ह्यात समोर आलेली होती. नांदेड जिल्ह्यातील एकाच गावात राहत असलेले एक प्रेमीयुगुल घरच्यांना कुठलीही कल्पना न देता पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते त्यानंतर आरोपीने सोबत राहत असलेल्या तरुणीवर संशय घेत असल्याकारणाने त्याने तिला फसवून बीड जिल्ह्यात आणले आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिचा गळा आवळला. तिच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून तिला मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तो तिथून फरार झालेला होता .

उपलब्ध माहितीनुसार, अविनाश रामकिसन राजुरे ( वय 25 राहणार शेळगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड ) असे आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत राहत असलेली सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22 ) हे दोघे एकाच गावातील असून दोघांचे प्रेम जुळल्यानंतर त्यांनी घरातून पळून पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे संसार थाटलेला होता. दोन वर्ष ते पती-पत्नीसारखे सोबत राहत होते मात्र याच दरम्यान अविनाश याच्या मनात संशयाची पाल चुकली आणि त्यानंतर पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक होते.

आपल्याला फिरायला जायचे आहे असे सांगत अविनाश याने तिला सोबत घेतले आणि बीड तालुक्यातील येळंबघाट येथे गेल्यानंतर त्यांनी एका खदानीमध्ये मुक्काम केला आणि 14 नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच त्याने तिचा गळा आवळला आणि सोबत आणलेले पेट्रोल आणि ॲसिड चेहऱ्यावर टाकून तिची ओळख पटणार नाही अशा पद्धतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तेथून पलायन केले . दुसऱ्या दिवशी सकाळी तेथील एका शेतकऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला आणि नेकनूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खबर देण्यात आली. घटनास्थळी पोलीस पोचले त्यावेळी तरुणी मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत होती त्यानंतर तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि मृत्यूपूर्व जबाब नोंदवण्यात आला त्यामध्ये तिने अविनाश याने हा प्रकार केल्याचे सांगितले होते.

आरोपी अविनाश याने पुणे जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात जात असताना नगर येथील एका ठिकाणावरून सावित्री हिला एक ड्रेसदेखील घेतलेला होता तसेच शिरूर इथून निघताना शेजारील महिलेकडे पाहून त्यांनी ‘ टाटा ‘ देखील केलेला होता या सर्व बाबी देखील विचारात घेतल्या गेलेल्या असून शिक्षा सुनावली त्यावेळी आरोपीच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप नव्हता. दुसरीकडे पीडित मुलीच्या घरच्यांना आज या शिक्षेबद्दल सुनावणी होणार आहे याची कल्पना देखील नव्हती . त्यांना ज्यावेळी आरोपीला जन्मठेप झाल्याचे समजले त्यावेळी त्यांनी त्याला जन्मठेप नव्हे तर फाशीची शिक्षा गरजेची होती असे म्हटलेले आहे. सदर प्रकरणात आत्तापर्यंत तब्बल 30 साक्षीदार तपासले गेलेले असून दिवाळीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने पूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. केजचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते.


शेअर करा