नगरमध्ये कशी होणार नालेसफाई ? चोरटयांनी पोकलेन नेला चोरून

शेअर करा

नगर शहरात नालेसफाईच्या कामासाठी आलेला एक पोकलेन चोरून नेण्याचा वेगळाच प्रकार नगर शहरात उघडकीला आलेला आहे. महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराचे पोकलेन मशीन भुतकरवाडी परिसरातील ताठे मळा येथील पंपिंग स्टेशन जवळून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. 12 सप्टेंबर रोजी ही घटना घडलेली असून त्यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तब्बल एक महिना उलटून गेला मात्र अद्यापही पोलिसांना चोरट्यांचा शोध लागलेला नाही त्यावर तक्रारदार यांनी संताप व्यक्त केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गोरक्षनाथ जगन्नाथ पठारे ( राहणार सोनई तालुका नेवासा ) असे तक्रारदार यांचे नाव असून नगर शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामासाठी खाजगी ठेकेदार म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यासाठी त्यांनी हा पोकलेन पंपिंग स्टेशन परिसरात आणलेला होता. काम संपल्यानंतर त्यांनी जवळ असलेल्या मोकळ्या जागेत हा पोकलेन ठेवला होता मात्र 12 सप्टेंबर रोजी ही चोरी झाली आणि पोकलेन परिसरातून गायब झाला.

परिसरातील नागरिकांना याविषयी माहिती विचारली असता त्यांनी काही लोकांनी हे मशीन मोठ्या ट्रेलरमध्ये टाकून नेले असल्याचे सांगितले असून त्यानंतर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही व्यक्ती चोरी करताना कैद झालेले असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र एक महिना उलटून देखील अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत.


शेअर करा