नगरमध्ये कायदा हातात घेत डॉक्टरांना मारहाण , तोफखान्यात गुन्हा दाखल

शेअर करा

नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून अशीच एक घटना डौले हॉस्पिटल शेजारी हार्टबीट रुग्णालय इथे घडलेली आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी दोन डॉक्टरांना जबाबदार ठरवत नातेवाईकांनी त्यांना मारहाण केलेली असून सहा तारखेला पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडलेली होती. तोफखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , नेवासा तालुक्यातील रांजणगाव येथील बबन रामभाऊ वाकचौरे यांना पाच तारखेला रात्री दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पहाटे दोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तक्रारदार डॉक्टर यांनी मुलगा आप्पासाहेब बबन वाघचौरे , काकासाहेब बबन वाकचौरे आणि इतर तीन जणांना ही माहिती दिली आणि कुटुंबीयांच्या वतीने डॉक्टरांना यासाठी जबाबदार ठरवण्यात आले.

आरोपी व्यक्तींनी त्यानंतर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली तसेच अतिदक्षता विभागाची देखील तोडफोड केली आणि वैद्यकीय उपकरणे खुर्च्या यांचे देखील नुकसान करण्यात आले त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी व्यक्तींच्या विरोधात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले असून तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची भेट घेऊन डॉक्टरांनी आपल्या व्यथा त्यांना सांगितल्या आहेत.


शेअर करा