
पोलीस दलातील असलेला मानसिक त्रास हा काही लपून राहिलेला नाही. अनेकदा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसाला देखील पोलीस दलातूनच अंतर्गत विरोधामुळे मोठ्या दबावाला सामोरे जावे लागते आणि त्यातून एखादी धक्कादायक घटना देखील घडते. असेच एक प्रकरण सध्या नगर जिल्ह्यात घडलेले असून राहुरी येथील मुळा धरण परिसरात पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस हवलदार यांनी आत्महत्या केलेली असून सदर प्रकरणात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
उपलब्ध माहितीनुसार, भाऊसाहेब दगडू आघाव ( वय 49 राहणार बारागाव नांदूर ) असे या पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव असून त्यांनी शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. विनयभंगाच्या गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यासाठी काही अधिकारी आपल्याला पैसे मागत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे. सदर घटनेनंतर अनेकदा वरिष्ठ अधिकारी पैशासाठी आपल्या सहकाऱ्यांना देखील सोडत नाहीत हे देखील समोर आलेले आहे.
भाऊसाहेब आघाव हे मुळा धरण परिसरातील गेटवर असलेल्या पोलिस चौकीत कार्यरत होते. शनिवारी सकाळी आठ वाजता ते चौकीत हजर झाले आणि समवेत असलेले इतर पोलीस कर्मचारी बाहेर गेल्याचे पाहून त्यांनी चौकीचे दार बंद करून घेतले आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडली. इतर सहकाऱ्यांना गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी खोलीकडे धाव घेतली मात्र दरवाजा आतून लावलेला होता.
सदर दुर्दैवी घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी त्यांच्यासोबत पोलिस उपअधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर विभागीय अधिकारी संदीप मिटके हे देखील हजर होते. पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पंचनामा केला.
भाऊसाहेब आघाव यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे, सहाय्यक फौजदार निमसे, महिला पोलीस कर्मचारी राऊत ( सर्वजण राहणार राजुर ) आणि नगर येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आघाव यांच्या नातेवाईकांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस ठाणे परिसरात ठिय्या मांडलेला होता.