नगर हादरलं..महिला पोलीस कर्मचाऱ्याचा राहत्या घरी गळफास

शेअर करा

नगर शहरात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार अर्चना रोहिदास कासार ( राहणार बोल्हेगाव ) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असून कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी सकाळी आठ वाजता घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

अर्चना कासार ह्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यरत होत्या. पतीचे निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर जिल्हा पोलीस दलामध्ये त्या भरती झालेल्या होत्या . शनिवारी रात्री त्यांना ड्युटी होती त्यानंतर सकाळी त्या घरी गेल्या आणि आणि खोलीत गेल्यावर बराच वेळ त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला जात नव्हता त्यामुळे मुलाला संशय आला म्हणून त्याने आजूबाजूच्या लोकांना बोलावले त्यानंतर दरवाजा उघडला असता अर्चना यांनी गळफास घेतलेला होता.

तत्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचे घोषित केले सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक अनिल कातकडे , तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना एक मुलगा एक मुलगी असून त्यांनी केलेल्या या प्रकारानंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.


शेअर करा