नगर हादरलं.. स्वतःचे सरण रचून तरुणाने घेतले पेटवून

शेअर करा

महाराष्ट्रात एका अत्यंत खळबळजनक अशी घटना नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात समोर आलेली असून शेतातील लाकडे जमा करून घराच्या पाठीमागे सरण रचून एका व्यक्तीने तारेच्या साहाय्याने स्वतःला बांधून पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे. नेवासा तालुक्यातील चांदा लोहारवाडी येथे ही घटना घडली असून रविवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार या तरुणाने केला आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अनिल साहेबराव पुंड ( वय 27 ) असे मयत युवकाचे नाव असून चांदा लोहारवाडी रस्त्यावर गुंड वस्ती येथे तो राहत होता. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याने सरण रचले आणि त्यानंतर त्यावर ठिबक सिंचनच्या जुन्या प्लास्टिकच्या नळ्या अंथरल्या तसेच लोखंडी तार गुंडाळून पेटवून घेतले . आत्महत्या करण्यापूर्वी त्याने घरात एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे.

सुसाईड नोटमध्ये त्याने माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे त्यात कोणाचाही दोष नाही मी सर्व जणांचा ऋणी आहे असे देखील लिहिलेले आहे तसेच आपला मोबाईल अनब्लॉक कसा करायचा असेदेखील लिहिलेले आहे. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी देखील तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सहायक फौजदार काकासाहेब राख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


शेअर करा