
मेडिकल प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा यात अपयश आल्यानंतर आत्महत्या केल्याचा एक प्रकार तामिळनाडूमध्ये समोर आलेला होता. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी याप्रकरणी शोक व्यक्त करत आत्महत्येचा विचार विद्यार्थ्यांनी मनात आणू नये असे म्हटलेले आहे.शनिवारी ही घटना समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी याच मुलाच्या वडिलांनी देखील आत्महत्या केली आणि त्यानंतर नीट परीक्षेच्या विरोधात राज्यात संताप पसरू लागला. जगदीश स्वर्णम असे या मयत तरुणाचे नाव असून 2022 मध्ये 427 मार्क घेऊन तो बारावी पास झाला होता. नीट परीक्षेत दोन वेळा प्रयत्न करून त्याला अपयश आले त्यानंतर त्याने हा प्रकार केलेला होता.
तामिळनाडू सरकारने यापूर्वीच 2021 मध्ये नीट परीक्षा टाळण्याचे एक विधेयक सभागृहात सादर केलेले होते . मेडिकल प्रवेशासाठी असलेली नीट परीक्षा ही उत्तर भारतातील विद्यार्थ्यांना झुकते माप देणारे आहे कारण गरीब कुटुंबातील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी महागडे खाजगी क्लासेस लावू शकत नाहीत त्यामुळे बारावीत जास्त मार्क मिळून देखील नीट परीक्षेमध्ये त्याचा फारसा फायदा होत नाही , असे सरकारचे म्हणणे होते.
तामिळनाडू राज्य सरकारने नीट वैद्यकीय परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विधानसभेत घेतलेला होता आणि विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांकडे देखील पाठवण्यात आलेले होते मात्र राज्यपालांनी यावर कुठलाच निर्णय घेतला नाही. राज्यपाल यांनी हे विधेयक आता राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्याकडे पाठवलेले आहे. एम के स्टॅलिन यांनी या प्रकरणावर बोलताना , ‘ येत्या काही दिवसात नीट परीक्षा ही राज्यातून हद्दपार होणार आहे. नीट परीक्षा ही लाखो रुपये परवडणाऱ्या लोकांसाठी आहे. ज्यांना बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेले आहेत असे विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून क्लास लावतात आणि एक दोन वर्षात परीक्षा पास होतात . नीट परीक्षा ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी झालेली असून राज्याने नीट परीक्षेत साडेसात टक्के आरक्षण ठेवलेले आहे त्यामुळे काही प्रमाणात का होईना सरकारी शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना संधी मिळत आहेत .’ असे देखील त्यांनी म्हटलेले आहे