
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून गेल्या पाच महिन्यांपासून तालुक्यातील कर्जुले हर्या येथील एक विवाहित युवक गायब झालेला आहे. परिसरातील राजकीय प्रस्थ असलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्याचा घातपात केला असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केलेला आहे . पारनेर पोलिसात तक्रार देऊन सहा महिने झाले मात्र तरी देखील पोलिसांकडून योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप करत सदर तरुणाचे वडील आणि कुटुंबीय यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दीपक सुदाम उंडे ( राहणार कर्जुले हर्या तालुका पारनेर ) असे गायब असलेल्या तरुणाचे नाव असून कुटुंबीयांच्या म्हणण्याप्रमाणे तो गोरक्ष दल , बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्यासोबतच एका राजकीय पक्षाशी देखील संबंधित होता. ४ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळच्या सुमारास तो मित्राकडे जाऊन येतो म्हणून घरातून निघून गेला मात्र परत आला नाही म्हणून सहा तारखेला त्याच्या कुटुंबीयांनी अखेर पारनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली होती.
आपला मुलगा गायब झाला म्हणून तक्रार देऊन तब्बल सहा महिने उलटले तरी देखील पोलिसांकडून तपासाला दिशा दिली गेली नाही . कॉल रेकॉर्ड काढण्यात आले आणि मोबाईल लोकेशन फक्त शोधण्यात आले आहे असे सांगत कुटुंबीयांनी परिसरातील एका राजकीय व्यक्तीवर देखील संशय व्यक्त केलेला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार , आतापर्यंत पोलिसांच्या तपासात आपल्या मुलाचे शेवटचे लोकेशन जे आढळून आलेले होते त्याच परिसरात आरोपींचे देखील मोबाईल लोकेशन आढळून आलेले आहे सोबतच ज्या दिवशी मुलगा गायब झाला त्या दिवशी एकाच फोन नंबरवरून त्याच्या फोनवर तब्बल सतरा वेळा कॉल आलेले होते. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले मात्र जुजबी चौकशी करून सोडून दिले .
कुटुंबीयांनी असाही आरोप केला आहे की , ‘ पारनेर पोलीस स्टेशन येथील एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक पोलीस शिपाई यांना याप्रकरणी राजकीय दबाव असल्याने आम्ही काही कारवाई करू शकत नाही असे देखील पोलिसांनी त्यांना म्हटलेले आहे . आपल्या मुलाचे शेवटचे लोकेशन हे वडगाव सावताळ इथे आढळून आलेले होते आणि तिकडे रात्री मुलाच्या जाण्याचे काहीच कारण नाही. सदर पोलीस अधिकारी आणि शिपाई यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे कारण तपासाची माहिती घेण्यासाठी म्हणून आपण पोलीस ठाण्यात पोचलो की दुसऱ्या मिनिटाला कथित आरोपींना आपल्या हालचालींबद्दल माहिती कशी होते ? सोबतच या कर्मचाऱ्यांची नार्को चाचणी करण्यात यावी.
कर्जुले हर्यापासून जवळ असलेल्या आणि मोठे राजकीय प्रस्थ असणाऱ्या एका परिवारावर कुटुंबीयांनी खळबळजनक असे आरोप केलेले आहेत . आपल्या मुलाचा पारनेर तालुक्यातील एका राजकीय पुढाऱ्याने घातपात घडून आणलेला असल्याची देखील खात्री आपल्याला आहे असे त्यांनी म्हटलेले आहे. पारनेर पोलीस तपासाची दिशा भरकटवत असल्याचा देखील त्यांनी आरोप केलेला असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर संपूर्ण कुटुंबीय उपोषणाला बसलेले आहे . वृत्त लिहीपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांची भेट घेतलेली नव्हती. आपल्याला न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा देखील इशारा कुटुंबियांकडून देण्यात आलेला आहे .