पारनेर पोलिसांवर खळबळजनक आरोप , आजींचे उपोषण आठव्या दिवशीही सुरूच

शेअर करा

नगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 80 वर्षीय वृद्ध आजींचे उपोषण अद्यापही सुरू असून आपल्या उपोषणाची पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे. गावातील अवैध दारूविक्री , विद्युत चोरी, नळाला लावण्यात येत असलेल्या मोटर याबद्दल कारवाई करावी म्हणून त्यांनी सुरुवातीला गावात उपोषण सुरू केले होते मात्र पोलिसांनी येऊन आपल्याला दमदाटी केली तसेच गावकऱ्यांनी देखील आपल्याला गावात देण्यास मज्जाव केलेला असून आपल्या जीविताला धोका आहे असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. उपोषणाला आठ दिवस झालेले असून आपल्याला जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्लॅन करण्यात आलेला आहे असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.

पारनेर तालुक्यातील पोखरी येथील रहिवासी असलेल्या श्रीमती शकुंतला किसन खैरे नावाच्या 80 वर्षीय आजीबाईंनी 16 तारखेपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केलेली असून गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती गावात येण्यापासून आपल्याला मज्जाव करत आहेत तसेच गावातील व्यक्तींपासून आपल्या जीविताला धोका असल्याची देखील त्यांची तक्रार आहे . पारनेर पोलीस निरीक्षक यांनी देखील पथकासोबत गावातील मंदिरात उपोषण सुरु असताना तिथे येऊन आपल्यासोबत अपशब्द बोलत गैरवर्तन केले आणि गावातील काही लोकांना हाताशी धरत आपल्याला गावाबाहेर जाण्यास मजबूर करण्यात आले, असेही त्यांनी म्हटलेले आहे . गेल्या अडीच महिन्यांपासून आपण गावाबाहेर राहत असून सदर प्रश्नी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालावे सोबतच आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे.

शकुंतला खैरे का करत आहेत उपोषण ?

पोखरी गावातील बेकायदेशीर दारू विक्रीचे अड्डे तातडीने उध्वस्त करून पोखरी गावातील दारुड्यांनी गावात जो काही हैदोस माजवलेला आहे तो त्वरित थांबवण्यात यावा. गावातील जुगार, बेकायदेशीर पेट्रोल विक्री , गुटका विक्री करणारे व्यक्ती हे राजकीय व्यक्तींचे समर्थक असून ते पुढारी जसे सांगतील तसे ऐकतात आणि गावातील सभ्य लोकांना त्रास देतात म्हणून सदर दोन नंबरचे धंदे देखील त्वरित बंद करण्यात यावेत. गावातील सुमारे 70 टक्के लोक घरगुती वापरासाठी राजकीय पुढार्‍यांच्या वरदहस्ताने वीज आकडे टाकून वापरत असून पिण्याच्या नळाचे पाणी देखील चोरीची वीज वापरून मोटार लावून उपसून घेत असल्याने वृद्ध व्यक्तींना देखील घरात पुरेसे पाणी मिळत नाही हे तात्काळ बंद करण्यात यावे सोबतच संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी.

पोखरी गावातील श्री रंगनाथ स्वामी मंदिरात आकडे टाकून वीज चोरून तिचा अनेक वर्षांपासून वापर सुरू आहे. मंदिरातील वीजेस माझा विरोध नाही मात्र या विजेचा लाभ मंदिरापेक्षा जास्त आजूबाजूच्या दारूच्या विक्रेत्यांना करून देण्यात आलेला असून त्यांच्याकडून आर्थिक लाभ मिळवला जाण्याची शक्यता मी स्वतः उघडकीला आणलेली आहे त्यासंबंधी आस्थापनाकडून चौकशी व्हावी आणि मंदिरातील ट्रस्टविरुद्ध उचित कारवाई करावी.

पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी माझ्याविरुद्ध पोखरी गाव भडकवण्याचे जे कृत्य केलेले आहे ते त्यांनी राजकीय लोकांच्या सांगण्यावरून केलेले असून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी केलेले आहे असा माझा आरोप असून असा पोलीस अधिकारी पोलीस सेवेत ठेवण्याच्या पात्रतेचा नसून त्यांच्या विरोधात बडतर्फीची कारवाई करण्यात यावी.

माझ्यासारख्या दमा, गुडघेदुखी, रक्तदाब , डोळ्यांनी कमी दिसणे अशा आजारांनी त्रस्त असलेल्या 80 वर्षीय वृद्ध महिलेविरुद्ध राजकीय पुढाऱ्यांनी संगनमत करून जातीआधारित अन्याय अत्याचार केल्याच्या घटनेचे मी पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलेले असून दिनांक १३ मार्च २०२३ रोजी माझ्या मुलाच्या विरोधात देखील अशाच स्वरूपाचा अन्याय आणि अत्याचार केल्याची तक्रार मी पोलीस अधीक्षक साहेबांना दिलेली आहे. फिर्यादी म्हणून माझ्या मुलाच्या तक्रारीवरून पारनेर पोलीस स्टेशनला मला त्रास देणाऱ्या आरोपींच्या विरोधात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात यावेत तसेच जोपर्यंत आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नाही असे देखील त्यांनी ठणकावलेले आहे.


शेअर करा