
‘ पार्टी विथ डिफरन्स ‘ सांगणार्या भाजपमध्ये अनेक गुन्हेगारी लोकांचा आधीच भरणा झालेला असताना चंद्रपूरमध्ये हत्या आणि दंगलीच्या गुन्ह्यातील माजी नगरसेवक याने भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आमच्याकडे गुजरातचे वॉशिंग पावडर आहे असे रावसाहेब दानवे यांनी एका भाषणात म्हटले होते. विरोधक देखील अनेकदा भाजपमध्ये गेल्यानंतर सगळी पापे धुतली जातात अशी टीका करत असतात त्यामुळे या प्रवेशावर चंद्रपुरात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अजय सरकार असे या माजी नगरसेवकाचे नाव असून कॅबिनेट मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अजय याने भाजपमध्ये प्रवेश केला. शनिवारी रात्री बंगाली कॅम्प भागात हा प्रवेश सोहळा पार पडला त्यावेळी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. अजय सरकार याचा मोठा प्रवेश सोहळा चंद्रपुरात साजरा करण्यात आल्याने पार्टी विथ डिफरन्सचे काय झाले असा देखील प्रश्न आता विरोधक भाजपला उपस्थित करत आहेत.
अजय सरकार या माजी नगरसेवकावर हत्या आणि दंगलीसारखे गुन्हे दाखल आहेत. पाच वर्ष चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता असून आता महिन्याभरात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केलेले आहेत. बंगाली कॅम्प भागात सरकार याचे मोठे वर्चस्व असल्याने भाजपने त्याला प्रवेश दिला असावा अशी टीका करण्यात येत आहे.