पुण्यात ‘ मंचर स्टोरी ‘ उघडकीस , बुरखा घातलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलगी

शेअर करा

एकीकडे केरळ स्टोरी चित्रपट मोठ्या प्रमाणात विक्रम मोडीत काढत असताना चित्रपटातील घटनेशी जुळेल असा एक प्रकार पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यात समोर आलेला आहे. एका अल्पवयीन मुलीला नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका तरुणाच्या विरोधात मंचर पोलिसात गुन्हा बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात केलेली आहे. सदर प्रकार हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जावेद मुक्तार शेख ( वय 22 ) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्याने 23 मार्च 2019 रोजी इतर धर्माच्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत पलायन केलेले होते. 16 मे 2023 रोजी मुलीचे नातेवाईक मंचर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी पोलिसांना पीडित मुलगी जिथे राहत आहे तेथील पत्ता दिला . पोलिसांसोबत मुलीच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेतली त्यावेळी तिथे ही मुलगी आढळून आलेली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झालेला असून व्हिडिओत या मुलीने चक्क बुरखा घातलेला आढळून आलेला असल्याने तिचे धर्मांतर झाले असल्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे तर मुलीच्या घरचे ‘ आम्ही तुला मारणार नाही ‘ असेही सांगताना व्हिडीओत आढळून येत आहेत.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी जावेद याला 17 मे रोजी अटक केलेली असून येरवडा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आलेली आहे . मुलीकडे तपास करून तिचा जबाब घेतला असता तिने आरोपीने आपल्यावर बलात्कार केला असल्याची फिर्याद दिलेली असून तिचा जबाब आणि वैद्यकीय तपास अहवाल याच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील करत असल्याची माहिती आहे.


शेअर करा