‘ पोलीस ठाण्यात चला तुमच्यावर गांजाची केस करतो ‘ , कसलेल्या तक्रारदाराने लावलं कामाला

शेअर करा

लाचखोरीचा एक अद्भुत असा प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आलेला असून गांजाची केस न करण्यासाठी तसेच जप्त करण्यात आलेली दुचाकी सोडण्यासाठी 20000 रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि त्यानंतर तडजोड करत 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्कर यास एसीबीच्या पथकाने अटक केलेली आहे. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार व्यक्ती यांचे चुलत भाऊ आणि त्यांचे मित्र यांना 23 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून पकडण्यात आले आणि त्यानंतर ‘ पोलीस ठाण्यात चला तुमच्यावर गांजाची केस करतो ‘ असे धमकवण्यात आले. जर गांजाची केस तुमच्यावर व्हावी अशी इच्छा नसेल तर आम्हाला प्रत्येकी 75 हजार रुपये द्या अशी मागणी करण्यात आली आणि तक्रारदाराच्या नातेवाईकाकडूनच पहाटेच्या सुमारास तीस हजार रुपये उकळण्यात आले आणि दुचाकी ठेवून घेण्यात आली.

सदर प्रकरणातील मुख्य संशयित शिवाजी बाविस्कर यांनी त्यानंतर दुचाकी सोडवायची असेल तर वीस हजार रुपये लागतील अशी मागणी केलेली होती आणि पंधरा हजार रुपयांवर या प्रकरणी तडजोड करण्यात आली. तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. १०६४ वर आलेल्या तक्रारीनंतर पथक सक्रिय झाले.

तक्रारदारांसोबत ठरल्याप्रमाणे 15000 रुपये घेण्यासाठी चोपडा शहरातील बसस्थानकाजवळ चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्कर आल्यानंतर लाच घेताच पथकाने झडप घालून त्याला अटक केलेली आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे , पोलीस निरीक्षक एन एन जाधव , दिनेशसिंग पाटील , बाळू मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे .


शेअर करा