
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस असून काल रात्री मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली त्यानंतर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर एक बंद लिफाफा घेऊन जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेले होते. अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांना हा बंद लिफाफा दिला आणि या लिफाफ्यामध्ये जरांगे पाटील यांच्यासाठी एक मेसेज होता मात्र तो वाचल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेणार नाही , असे पुन्हा एकदा ठणकावले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना सरकारकडून सात सप्टेंबरला जीआर काढण्यात आलेला होता त्या जीआरमध्ये आम्ही दुरुस्ती सुचवलेली होती . संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळावं अशी आमची मागणी आहे. सरकारच्या जीआरमध्ये असा स्पष्टपणे उल्लेख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी म्हटलेले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारच्या आत्तापर्यंतच्या वर्तनावर चिंता व्यक्त करत , ‘ आमच्यावर इतका मोठा भ्याड लाठीचार्ज हल्ला झाला मात्र लाठीचार्ज करणाऱ्यावर कारवाई झालेली नाही. वास्तविक कारवाई ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यापेक्षा बडतर्फीची कारवाई होणे गरजेचे होते. आमच्यावर गोळीबार करणारे मुंबईत शिष्टमंडळाला फिरताना दिसले. कारवाई करावी की नाही ते सरकारने ठरवावे पण आमच्यावर आमच्यावरील गुन्हे मागे घ्या ,’ असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.
सरकारने 2004 चा एक जीआर काढलेला होता त्या जीआरचा देखील आम्हाला काहीच फायदा झाला नाही. सध्याच्या नवीन जीआरमध्ये थोडीशी दुरुस्ती राहिलेली आहे ती सरकारने करून घ्यावी असे देखील सांगत त्यांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले तसेच कुणासोबतही द्वेषाची भावना ठेवू नका असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.