
राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने परिसरात रसवंती ग्रह आणि थंड पदार्थ विकणाऱ्या वस्तूंची चलती सुरू आहे. लहान मुलांच्या आवडीचा असलेला बर्फाचा गोळा देखील अनेक फेरीवाले विकत असून त्यामध्ये वापरले जाणारे बर्फ खाण्यास योग्य आहे की नाही यामध्ये देखील नागरिकांचा गोंधळ उडतो. खाण्यासाठी बनवण्यात आलेला बर्फ कोणत्या पाण्यापासून बनवलेला आहे याची माहिती नसल्याने अनेकदा यातून आरोग्यास देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
योग्य पद्धतीने बर्फ तयार करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना घेणे बंधनकारक असून त्यामध्ये खाण्यायोग्य असलेला बर्फ हा पांढऱ्या रंगाचा आणि पारदर्शक असतो तर इंडस्ट्रीतील कामासाठी वापरला जाणारा बर्फ हा नियमाप्रमाणे निळ्या रंगाचा असायला हवा असे निर्देश आणि औषध प्रशासनाने दिलेले असून आपण ज्या ठिकाणी थंड पदार्थ खात आहोत त्या ठिकाणी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
बऱ्याच वर्षांपासून बर्फामध्ये खाण्याचा बर्फ आणि इंडस्ट्रीसाठी वापरला जाणारा बर्फ यात फरक केला जात नव्हता मात्र नागरिकांच्या जीविताची काळजी घेत हा बदल करण्यात आलेला असून यासंदर्भात स्पष्ट निर्देश बर्फ तयार करणाऱ्या उत्पादकांना देण्यात आलेले आहेत. निळ्या रंगाच्या बर्फाचा वापर खाण्याच्या पदार्थासाठी केला जात असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी अशा ठिकाणी खाणे टाळावे सोबतच अन्न आणि औषध प्रशासन विभागाला देखील याप्रकरणी तक्रार करावी असे आवाहन विभागाकडून करण्यात आलेले आहे .