
महाराष्ट्रासह देशात सर्वत्र लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र असून अनेक मुलींच्या वाढत्या अपेक्षादेखील त्यासाठी कारणीभूत आहेत . बहुतांश मुलींना नोकरीवाला नवरा पाहिजे असतो , ग्रामीण भागात राहणारा शेतकरी नवरा नको असतो मग शेतकरी कितीही समृद्ध आणि निर्व्यसनी असला तरी देखील अनेकदा वधू पिता जावई म्हणून सहसा शेतकऱ्याला प्राधान्य देत नाही त्यामुळे मुलांची लग्नाची वय उलटून चाललेली असून शिक्षण, शेती, पैसा सर्वकाही आहे मात्र लग्न होत नसल्याने एका शेतकरी मुलाने अनोखे आंदोलन केलेले आहे.
जळगावच्या पाचोऱ्यात त्याने हे आंदोलन केलेले असून आंदोलन करणारा तरुण हा उच्चशिक्षित आहे . ‘ बागायतदार आहे बागायतदारीन पाहिजे ‘ असे मोठमोठ्याने ओरडत घोषणा देत हातात फलक घेऊन आणि कपाळाला मुंडावळ्या बांधत नवरदेवाच्या वेशात त्याने हे आंदोलन केलेले आहे.
आंदोलनकर्त्या तरुणाचे नाव पंकज राजेंद्र महाले असे असून तो बीएससी ऍग्री झालेला आहे. पाचोरा तालुक्यातील नाचनखेडे इथे त्याची दहा एकर बागायत शेती आहे . लग्नासाठी वधू मिळत नसल्याकारणाने तो निराश झाला आणि अखेर त्याने बागायतदार शेतकरी पुत्र असून देखील आपल्याला मुलगी मिळत नाही मग शेतकऱ्यांच्या पोरांनी लग्न तरी कोणासोबत करायचे म्हणत आंदोलनाला सुरुवात केली. त्याच्या या आंदोलनाची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे.