
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सध्या बीड जिल्ह्यातील केज येथे समोर आलेला असून सख्ख्या भावाने कोयत्याने हल्ला केल्यानंतर कशाबशा वाचलेल्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर चक्क भाऊजयीने पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. काडी पेटवण्याच्या नादात उशीर झाल्याने तहसीलदार आशा वाघ ह्या पळाल्या आणि त्यामुळे त्यांचा प्राण वाचला.
केज येथील तहसील कार्यालयात संजय गांधी आणि श्रावण बाळ निराधार योजनेच्या काम पाहत असलेल्या नायब तहसीलदार याआधी देखील अशाच एका हल्ल्यातून वाचलेल्या आहेत. शुक्रवारी दुपारी त्या घरून दुचाकीवर तहसील कार्यालयाकडे जात असताना जीपमधून त्यांची भावजयी असलेली सुरेखा मधुकर वाघ आणि तिचा भाऊ हरिदास भास्कर महाले सोबत तिची आई अंजाबाई भास्कर महाले आणि एक अनोळखी महिला यांनी त्यांना अडवले आणि जळगाव जिल्ह्यातील एका संपत्तीवर हक्कसोड करण्यासाठी सही मागितली. त्यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी चक्क त्यांच्या गळ्यात दोरीचा फास टाकला तर हरिदास महाले याने देखील त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले.
भावजयी ही काडी पेटवून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करत होती मात्र आरडाओरडा झाल्याने तसेच आशा वाघ यांनी हिसका दिल्याने आरोपींच्या प्रयत्नाला यश आले नाही त्यानंतर त्यांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि बीड रोडकडे पलायन केले. हल्लेखोर चार चाकी वाहनातून पळून गेलेले असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. याआधी देखील आशा वाघ यांच्यावर सहा जून 2022 रोजी सख्खा भाऊ मधुकर वाघ याने कोयत्याने हल्ला केलेला होता त्यातही त्या बचावलेल्या होत्या.