
देशात एक अत्यंत संतापजनक घटना मध्यप्रदेशातील बैतूल येथे समोर आली असून एका हॉस्टेलमध्ये पैसे चोरल्याचा आरोप करत काही विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आलेली आहे. त्यांच्या तोंडाला काळे फासून गळ्यात माळ घालून होस्टेल परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली. धक्कादायक म्हणजे यामध्ये अवघ्या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा देखील समावेश होता. भाजपशासित राज्यात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
बेटी बचाव बेटी पढाव असे सांगत महिला सुरक्षेचा दावा करणाऱ्या भाजपच्या राज्यातच महिलांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीला येत आहे. होस्टेलच्या चालकाला या प्रकरणी निलंबित करण्यात आले असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.
दामजीपुरा येथील आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कस्तुरबा गांधी गर्ल्स हॉस्टेलमध्ये ही घटना घडली असून पाचवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीचे आई-वडील तिला भेटण्यासाठी हॉस्टेलवर आले होते त्यावेळी मुलीने त्यांना आपल्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी जाब विचारला त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली म्हणून अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून होस्टेलच्या चालकाला या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.