मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम , ‘ वंशावळ ‘ शब्द काढून टाकण्याची मागणी कारण..

शेअर करा

जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण दहा दिवस उलटून गेले तरी देखील सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्णय ठाम आहे. राज्य सरकारने जीआर काढला मात्र त्यात वंशावळ शब्द टाकल्यामुळे जरांगे पाटील यांनी या जीआरचा समाजातील कुणालाच फायदा होणार नाही असे सांगत सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आपला संघर्ष सुरूच राहणार आहे असे म्हटलेले आहे.

एका व्यक्तीने मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी , ‘ तुम्हीच आत्महत्या केल्या तर आरक्षणाचा फायदा कोण घेणार ? . मराठा आरक्षणासाठी माझ्यावर विश्वास ठेवा. कोणीही उग्र आंदोलन करू नका कारण विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होता कामा नये कारण गुन्हे दाखल झाले तर शिक्षणाला अडचण येईल ‘, असे म्हटलेले आहे

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की , ‘ आम्ही आंदोलन करत असताना तुम्ही उग्र आंदोलन करण्याचा अट्टाहास करू नका . मराठा समाजाने लोकशाही मार्गाने आंदोलन करावे ‘. विदर्भातून काही कुणबी समाज बांधवांकडून देखील विरोध होत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे पाटील यांनी ‘ ते आमच्या जिजाऊंच्या भूमीतील लोक आहेत. लहान मोठ्या भावाचा प्रश्न नाही गैरसमजातून ते असे वागत असतील त्यांचा गैरसमज दूर होईल ‘, असे म्हटलेले आहे.

मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देवून त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ द्या, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. विशेष म्हणजे निजामकाळात मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी असं जात प्रमाणपत्र देण्यात येत होतं. पण निजाम संस्थान महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर मराठ्यांचं आरक्षण गेलं. तेव्हापासून आरक्षणाची आमची लढाई सुरु असल्याचं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे.

महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये कुणबी नोंद असलेले जुने रेकॉर्ड नैसर्गिक आपत्ती तसेच इतर काही कारणांमुळे गायब झालेले असल्याकारणाने अनेक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. आपल्या भावकीतील कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालेले असले तर त्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवता येते मात्र अनेक ठिकाणी जुने रेकॉर्ड आढळून येत नसल्याकारणाने खुल्या प्रवर्गातून शैक्षणिक पातळीवर मोठी फी विद्यार्थ्यांच्या पालकांना भरावी लागते त्यामुळे देखील मराठा बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.


शेअर करा