
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असलेला संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून पुण्यातील लोणीकंद पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोलवडी येथील जाहीर सभेत बोलताना मनोहर कुलकर्णी याने वादग्रस्त वक्तव्य केलेले असल्याने त्याच्यासोबतच आता सभेच्या आयोजकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , शनिवारी संध्याकाळी कोलवडी येथील एका मंगल कार्यालयात मनोहर कुलकर्णी याच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना त्याने अनेक वादग्रस्त विधाने केलेली असून त्यामध्ये तिरंगा ध्वजाबद्दल देखील आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दोन्ही समुदायात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाची देखील त्याने काही वक्तव्य केली त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
देशात सध्या भाजपविरोधी आघाडीला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळताना दिसत येत असून इंडिया नावाने ही आघाडी कार्यरत आहे . इंडिया आघाडीच्या बैठकीवर देखील मनोहर कुलकर्णी याने जोरदार टीका केली असून ही आघाडी म्हणजे कौरवांच्या वंशाच्या या आघाडीची बैठक असल्याचे देखील तो म्हणालेला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी अशाच स्वरूपाचे अनेक गुन्हे याआधी देखील त्याच्या विरोधात आहेत मात्र त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याकारणाने तो सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहे.