‘ मराठा आरक्षणाचा जीआर येईपर्यंत माघार नाही , ‘ मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

शेअर करा

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथे उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती असून त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण देखील गेलेला नाही मात्र तरीदेखील उपोषणाचा त्यांचा निर्धार ठाम असून राज्य शासनाचे शिष्टमंडळ काल त्यांच्याकडे चर्चेसाठी आलेले होते मात्र त्याचे काहीही फलित अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

‘ जोपर्यंत मराठा आरक्षणाचा जीआर येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही ‘ अशा भूमिकेवर मनोज जरांगे ठाम असून त्यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर अखेर त्यांना सलाईन लावण्यात आलेले आहे. काल संध्याकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. ‘ मराठा आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही गरज वाटली तर सलाईन लावतो ‘ असे सांगत मनोज जरांगे यांनी उपोषणस्थळावरून रुग्णालयात हलण्यास देखील साफ नकार दिलेला होता त्यामुळे आहे तिथेच त्यांना सलायन लावण्यात आलेले आहे.

शिवसेनेच्या उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांचे कौतुक केले असून , ‘ जालन्यातील एका लहान खेड्यात उपोषणाला बसलेले जरांगे पाटील तुमच्या प्रलोभनांना आणि दबावाला झुकत नाहीत याचे कौतुक आहे. महाराष्ट्राला सरकारने दिलेली वचने पोकळ आणि फसवी होती. 50 खोक्यांनी विकली जाणारी आणि खोक्यांपुढे झुकणारी ही माणसे नाहीत. साधी गरीब फाटकी माणसे आहेत अन ती न्यायासाठी लढा देत आहेत ‘, असे कौतुक केलेले आहे.


शेअर करा