मराठा आरक्षणासाठी दोन एकर विकली पण.., मनोज जरांगे पाटील एक संघर्षयोद्धा

शेअर करा

जालना जिल्ह्यातील एका लहान खेडेगावातून सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद आता राज्यभरात उमटण्यास सुरुवात झालेली असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावलेली आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील मनोज जरांगे पाटील यांचा समाजासाठीचा संघर्ष देखील थक्क करणारा आहे.

मनोज जरांगे पाटील यांची आर्थिक स्थिती सामान्य असून इयत्ता बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण झालेले आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मातोरी हे त्यांचे मूळ गाव असून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे राहतात. मराठा समाजासाठी ते पूर्णवेळ कार्यरत असून त्यांच्या कुटुंबात एक मुलगा मुलगी आणि आई-वडील आहेत. सुरुवातीला त्यांची चार एकर जमीन होती मात्र मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी दोन एकर जमीन विकण्याची त्यांच्यावर वेळ आली मात्र अद्यापही संघर्ष सुरूच आहे .

मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असल्याने काही वर्षांपूर्वी जालना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे आले मात्र जेम्स लेन प्रकरणात पक्षाशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणतीही तडजोड होणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेत त्यांनी 2011 मध्ये शिवबा संघटनेची स्थापना केली आणि मराठवाड्यात संघटनेचा विस्तार केला. कोपर्डी प्रकरणात आरोपींना फाशी झाली पाहिजे यासाठी देखील त्यांनी मोठा संघर्ष केला आणि आरोपींना न्यायालयाबाहेरच यावेळी मारहाण करण्यात आलेली होती.

मागील दहा दिवसांपासून जरांगे पाटील यांच्या पोटात अन्नाचा कण नाही त्यामुळे लवकरात लवकर सरकारने तोडगा काढावा अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे. मराठा समाजासाठी त्यांचा लढा दिसत असल्याने त्यांच्या लढ्याचा आपल्याला अभिमान आहे म्हणून कुटुंबासाठी जास्त वेळ ते देऊ शकत नाहीत याबद्दल देखील आम्हाला कधी खंत वाटत नाही असे सांगत लहान मुलगा आणि मुलगी यांनी देखील आपल्या वडिलांच्या संघर्षाचा आम्हाला अभिमान आहे असे म्हटलेले आहे.


शेअर करा