
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सिनेकलावंतांचा चंदेरी दुनियेतील ‘स्ट्रगल’ पुस्तकरूपाने रसिकवाचकांच्या भेटीला आला असून या पुस्तकाचे लेखन हरहुन्नरी कलावंत-लेखक आशिष निनगुरकर याने केले आहे.प्रतिभा प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे नाव ‘स्ट्रगलर’ असे आहे.या पुस्तकात लोकप्रिय वीस सिनेकलावंतांचा स्ट्रगल आहे.या पुस्तकाची पहिली आवृत्ती काही वर्षांपूर्वी आली होती,पण अल्पावधीच ही आवृत्ती संपली. आता या पुस्तकाला प्रचंड मागणी असून दुसरी आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच राळेगणसिद्धी येथे दिग्दर्शक अमृत झांबरे,निर्माता डॉ.संतोष पोटे,दिग्दर्शक स्वप्निल शेटे,दिग्दर्शक सतीश फुगे,दिग्दर्शक शिवाजी करडे व लेखक आशिष निनगुरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
अक्षर मानव आयोजित शॉर्टफिल्म स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन राळेगणसिद्धी येथील नवीनभाऊ फिरोदिया सभागृहात करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमात युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘स्ट्रगलर’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रसिद्ध लेखक राजन खान व अनेक लेखक-दिग्दर्शक उपस्थित होते.आशिष सिनेसृष्टीशी संबंधित अनेक क्षेत्रात कामे करत आहे.आशिषने आतापर्यंत काही चित्रपटात व अनेक मालिकांमध्ये त्याच्या छोट्याश्या भूमिकेतून अभिनयाची चुणूक दाखविली असून त्याबरोबरच मालिकालेखन,चरित्रलेखन व गीतलेखन अशा क्षेत्रात तो आपली मुशाफिरी करत आहे.यापूर्वी त्यांनी अनेक वृत्तपत्रे,विविध मासिके व दिवाळी अंकांमधून त्याच्या लेखनाचे पैलू दाखविले आहेत.तसेच आशिष यांनी लिहिलेल्या लघुपट, माहितीपट व चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले असून विविध चित्रपट महोत्सवात त्याची दखल घेण्यात आली आहे.
चित्रपटसृष्टीत आज उंच भराऱ्या घेणाऱ्या कलाकाराने करियरच्या प्रारंभी संघर्ष केलेला असतो.स्वतःची कलावंत म्हणून ओळख प्रस्थापित करण्याच्या वाटचालीत अनेक मानपमान,निराशा,अपेक्षाभंग सहन केलेले असतात.कुणाला मोक्याच्या क्षणी संधी मिळते.गुरु लाभतात.मदत मिळते.कितीही प्रस्थापित सेलिब्रिटी कलावंत असला तरी त्याला ‘स्ट्रगल’ चुकलेला नसतो.हा कलाकार मात्र त्याचा हा ‘स्ट्रगल’ विसरू शकत नाही.त्याच्या आजच्या यशाला,झगमगाटाला भुलणाऱ्या सर्वसामान्यांना त्यामागची तपश्चर्या,सतत चिकाटीने केलेले प्रयत्न,संघर्ष दिसत नाही.रसिकवाचकांना त्यांच्या लाडक्या कलावंतांचा हा ‘स्ट्रगल’ समजावा म्हणूनच हे पुस्तक….”स्ट्रगलर” अशी प्राथमिक ओळख या पुस्तकाची रचना आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील मकरंद अनासपुरे,श्रेयस तळपदे,सिद्धार्थ जाधव,जितेंद्र जोशी,संतोष जुवेकर,संदीप कुलकर्णी,सुनील बर्वे,संदीप पाठक,पंढरीनाथ कांबळे,शरद पोंक्षे,मिलिंद शिंदे,नंदू माधव व समीर दीक्षित यांच्यासमवेत आघाडीच्या अभिनेत्री अमृता खानविलकर,तेजस्विनी पंडित,अमृता सुभाष,क्रांती रेडकर,शिल्पा तुळसकर,मुक्ता बर्वे व भार्गवी चिरमुले आदींचा चंदेरी दुनियेतील ‘स्ट्रगल’ आशिष यांनी शब्दबद्ध केला आहे.या पुस्तकाला सिनेसमीक्षक व लेखक अशोक उजळंबकर यांची प्रस्तावना लाभली असून प्रसिद्ध अभिनेते अनंत जोग व प्रदीप कडू यांनी अभिप्राय दिला आहे.नवे काहीतरी करण्याची उर्मी व त्यासाठी संघर्षाची मानसिकता असेल तर कलाक्षेत्र आपणास स्वीकारते,असे हक्काने सांगणारा आशिष या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना या पुस्तकातून चंदेरी दुनियेचा मार्ग कसा आहे असा संदेश देऊ पाहतो.नव्या उभरत्या सिताऱ्यांना व रसिकवाचकांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल,असा विश्वास प्रतिभा प्रकाशनचे प्रफुल्ल देशपांडे यांनी व्यक्त केला.आशिषच्या ‘संघर्ष’मयी अशा ‘स्ट्रगलर’ पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीला रसिकवाचक नक्कीच उदंड प्रतिसाद देतील हा विश्वास वाटतो.पुस्तकासाठी संपर्क ९०२२८७९९०४ करू शकता.सूत्रसंचालन अमृत झांबरे तर आभार किरण झांबरे यांनी मानले.